Ram Mandir: 'जीवन सार्थकी लागले'; पुण्यातील कारसेवकांची भावना

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 4 August 2020

सकाळने कारसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. राम‌ मंदीर पूर्णत्वास‌ येत‌ असल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.

पुणे, ता. 4 : "हिंदू हित की बात‌ करेगा वो ही देश पे राज करेगा.... मंदीर वही बनायेंगे... या घोषणांनी भारलेला‌ तो‌ काळ होता.  भव्य राम मंदिराचे भूमिपूजन होईल आणि दोन्ही घोषणा पूर्णत्वास येतील. आयुष्यभर आम्ही तेच स्वप्न पाहिले होते. आता जीवनाचे सार्थक झाले...राम मंदीर उभारणीसाठी ज्यांनी कारसेवा केली, त्या  हिंदू कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत. रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‌ हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होईल. त्यानिमित्त‌‌ सकाळने कारसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. राम‌ मंदीर पूर्णत्वास‌ येत‌ असल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.

कोविड विरोधात अमेरिकचं काम चांगलं, भारतात प्रचंड समस्या- डोनाल्ड ट्रम्प

अॅड. उज्ज्वल केसकर म्हणाले, "देशावर हिंदूंचे‌ राज्य आणि अयोध्येत‌‌‌ त्या‌ जागी भव्य राम मंदिर हे स्वप्न आम्ही आयुष्यभर पाहिले. सुरवातीला बाबरी मशिदीवर पहिला भगवा फडकला म्हणजे 1990 आणि 1992 अशा दोनवेळी मी तिथे‌ होते. हा काळ अत्यंत भारलेला होता. संपूर्ण देशात‌ मंदीर वही बनाएंगे‌ या घोषणा गुंजत होत्या. ही घोषणाच सत्यात‌ उतरत‌ आहे, याचा प्रचंड आनंद आहे. जीवन सार्थकी लागले, आता आयुष्यात‌ काही नाही मिळाले,‌ तरी चालेल, अशीच भावना मनात आहे."

राम मंदिराच्या उभारणीला सुरवात हा राष्ट्राचा, स्वाभीमानी हिंदू नागरिकांचा, धर्माचा आणि आपल्या संस्कृतीचा हा फार मोठा सन्मान आहे, असे सांगत विलास पानगुडवाले म्हणाले, "राम मंदीर पाडून तिथे बाबरी उभारली गेली. त्यामुळे मंदीर तेथे उभारायचे, हीच लोकभावना होती. त्यासाठी सुरू झालेल्या लोक आंदोलनाचा मी सुरवातीपासून साक्षीदार आहे. गेली अनेक वर्षे आम्ही त्यासाठी झटत होते. अखेर आज तो क्षण आला आहे. लाखो कारसेवकांच्या आकांक्षेला आता आकार येणार आहे. माझ्यासह असंख्य कार्यकर्ते हाल‌ सोसत‌ अयोध्येत गेले होते. त्यांचे स्वप्न साकार होईल, याचा मनापासून आनंद आहे."

भूमिपूजन सोहळ्यापूर्वी राम मंदिरातील आणखी एका पुजाऱ्याला कोरोना

माजी‌ नगरसेवक सुहास कुलकर्णी म्हणाले, "राम मंदिराची‌ पायाभरणी होते आहे, हा आमच्या भाग्यचा दिवस आहे. हे मंदीर उभे राहावे, यासाठी अनेक वर्षे असंख्य लोक लढत राहिले. जातपात विसरून केवळ रामभक्तीमुळे मोठे जनआंदोलन उभे राहिले. मी 1990 आणि 1992 अशा दोन्ही वेळेला कारसेवेत‌ सहभागी झालो होतो. परंतु 1990 मध्ये आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परतावे लागले. परंतु बाबरी पतनावेळी आम्ही तिथे होतो. प्रचंड मोठी‌ लोकभावना त्यावेळी संघटित झाली आणि बाबरीचे पतन झाले. त्याजागी आज‌ मंदिराचे भूमिपूजन होते असल्याने कृतार्थ झाल्यासारखे वाटते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram mandir foundation day pune casevak comment