''श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल'' : स्वामी गोविंददेव महाराज

ram Temple will become the cultural capital of the world said Swami Govinddev Maharaj in pune
ram Temple will become the cultural capital of the world said Swami Govinddev Maharaj in pune

पुणे : अयोद्धेचे राममंदिर केवळ मंदिर नसून, राष्ट्रमंदिर आहे. याठिकाणी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र उभारणी होणार असल्याने हे मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी होईल. या मंदिरासाठी सामान्य नागरिकांच्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे. यासाठी १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या काळात निधी संकलन अभियान राबविले जाणार असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांना आज पत्रकार परिषदेत दिली. 

धनसंकलन हा या अभियानाचा उद्देश नसून, घराघरांतून आपल्या संस्कृतीची माहिती पोचविणे असल्याचे स्पष्ट करत गोविंदगिरी महाराज म्हणाले, ‘‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या कामाने गती घेतली आहे. हे काम तीन ते साडे तीन वर्षांच्या काळात पूर्ण होईल. बांधकामानंतर आधी संपूर्ण भारत, नंतर जवळपासचे आशियायी देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रूपात ती पुढे येऊन जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे स्वरूप तिला येईल. या कार्याच्या अर्थसंकलनासाठी १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत ‘निधी समर्पण अभियाना’चा आरंभ होत आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गावे, तसेच ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दीड लाख कार्यकर्ते काम करणार आहेत. पावती पुस्तकांबरोबरच एक हजार, शंभर आणि दहा रुपयांच्या कूपन्सच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून कोणताही निधी घेणार नाही.’’ 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

महाराष्ट्रातील प्रगतीसंदर्भात ते म्हणाले, ‘‘निधी संकलनासाठी प्रत्येक जाती, संप्रदाय, पंथ, क्षेत्र, भाषा, प्रदेशातील भाविकांशी संपर्क होईल. संपूर्ण महाराष्ट्रात ४५ हजार गावातील २.५ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट आहे. यात ५००० संत आणि २.५ लाख रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ अभियानचे लक्ष गाठण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ७ शासकीय जिल्ह्यात १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत हे अभियान होणार आहे.’’ 
पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे, मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर, रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे, प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे, पुणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर उपस्थित होते. 

असे असेल मंदिर... 
- प्रस्तावित मंदिर तीन मजल्यांचे व २.७ एकर जागेवर. 
- मंदिर पूर्णपणे दगडामध्ये बनविण्यात येणार असून, त्यात सिमेंट व लोखंडाचा वापर टाळला जाईल. 
- प्रत्येक मजल्याची उंची २० फुटांची. 
- मंदिराची एकूण उंची १६१ फूट, तर लांबी ३६० फूट आणि रुंदी २३५ फूट. 
- त्यावर पाच शिखरे. 
- तीन मजल्यांमध्ये मिळून एकूण १६० स्तंभ. 
- मंदिराच्या बाहेर सुमारे १०८ एकर जागेवर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन आदी सुविधा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com