लालपरी हळुहळू रुळावर येऊ लागली

मिलिंद संगई
Thursday, 24 September 2020

राज्य शासनाने लालपरीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी दिल्यानंतर आता हळुहळू प्रवासी पुन्हा एसटीकडे वळू लागले आहेत, अशी माहिती एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली. 

बारामती (पुणे) : राज्य शासनाने लालपरीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी दिल्यानंतर आता हळुहळू प्रवासी पुन्हा एसटीकडे वळू लागले आहेत, अशी माहिती एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली. 

पुणे शहरासह पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात मिळून एसटीची 13 आगार आहेत. यामध्ये जवळपास 814 बसेस असून दररोज साधारणपणे तीन लाख 18 हजार कि.मी. अंतर या बसेस धावतात. यामध्ये छोटा, मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. 

18 मार्चनंतर एसटीच्या एकूणच कामकाजावर प्रचंड परिणाम झाला. इतर क्षेत्राप्रमाणे एसटीलाही या काळात कमालीचा तोटा सहन करावा लागला आहे. दररोज एसटीच्या साधारण 1100 फे-या जिल्हाअंतर्गत व जिल्हाबाहेर होतात. यातून एसटीच्या पुणे विभागाला दैनंदिन साधारणपणे 1 कोटी 10 लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. 

लॉकडाऊननंतर आता एसटी हळुहळू सुरळीत होऊ लागली असली तरी सध्या 275 बसेसच्या माध्यमातून 90 हजार कि.मी. अंतर पार करत 325 फे-या होत असल्याचे गायकवाड म्हणाले. लॉकडाऊनपूर्वी दैनंदिन एक कोटी रुपये असलेले उत्पन्न आता 15 लाखापर्यंत जाऊ लागले आहे. गेल्या सात महिन्यात एसटीलाही प्रचंड मोठ्या तोट्याला तोंड द्यावे लागले आहे.
 
राज्य शासनाने आता पुरेशी काळजी घेऊन पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी दिली असल्याने सर्वच आगारांमार्फत पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, प्रवाशांनीही एसटीने प्रवास करणे पुन्हा सुरु करावे, असे आवाहन ही गायकवाड यांनी केले आहे. 

सुरक्षित व स्वस्त प्रवास....

आजही राज्यात सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. समाजाच्या सर्व स्तरातील घटकांना प्रवासासाठी लालपरी जवळची वाटते. आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी मास्क व सॅनेटायझर्सचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचे भान बाळगून एसटीने प्रवास पुन्हा सुरु करावा. असे पुणे राज्य मार्ग परिवहन मंडळाचे पुणे जिल्हा नियंत्रक रमाकांत गायकवाड म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramakant gaikwad controller pune division st said that passengers are slowly turning to st again