Ramdas Athawale : देश संविधानाने जोडलेला आहे : रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale  statement Dr Babasaheb Ambedkar has united India with constitution of the india

Ramdas Athawale : देश संविधानाने जोडलेला आहे : रामदास आठवले

पुणे : ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन भारत देश जोडलेला आहे. मात्र काँग्रेसने जाती-पातीचे राजकारण करून देश तोडण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेतून देश जोडण्याबाबत सांगत आहे. संविधान धोक्यात असल्याचा समज पसरवत आहेत. पण कोणीही संविधान बदलू शकत नाही’’ असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केले.पुण्यात आले असता आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, ‘रिपाइं’ नेते परशुराम वाडेकर, प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, महिपाल वाघमारे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, संजय सोनवणे, विशाल शेवाळे, मोहन जगताप, बसवराज गायकवाड, नीलेश आल्हाट, वीरेन साठे, यशवंत नडगम, श्याम सदाफुले, राजेश गाडे, अक्षय गायकवाड, आनंद लवटे, वैभव पवार, महादेव साळवे आणि जयदेव रंधवे यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘‘मोदी सरकार संविधान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्यानेच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चुकीची भाषा वापरली. मात्र, त्यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. शाईफेक प्रकरणातील तरुणांना जामीन झालेला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक ताणला जाऊ नये. सर्वांनी शांतता पाळावी आणि महापुरुषांचा सन्मान ठेवावा. हे सर्वच महापुरुष अनेक पिढ्यांसाठी आदर्श राहणार आहेत.’’ शैलेंद्र चव्हाण यांनी स्वागत प्रास्ताविक केले व आभार मानले.

तर आम्हीही ‘पठाण’विरोधात आंदोलन करू : आठवले

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. जसा भगवा रंग भाजप, शिवसेनेचा आहे; तसाच आमचा पण रंग भगवा आहे. मात्र, गाण्यातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. बेशरम शब्द काढला नाही, तर आम्हीही आंदोलन करू, असा इशारा आठवले यांनी दिला. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येतील. स्तंभाजवळ सभा घेता येणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमचा या निर्णयाला विरोध नाही. ज्यांना सभा घ्यायची ते आजुबाजूबाजूला घेऊ शकतात. याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी केली.