जुने शिरूर येथे रामजन्म सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम जन्माच्या सोहळा

जुने शिरूर येथे रामजन्म सोहळा उत्साहात

शिरूर - प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुने शिरूर येथील श्री रामलिंग महाराज मंदिरात रामजन्माचा सोहळा आज असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने पार पडला. पारंपारिक पाळणा आणि रामजन्माच्या गीतांनी परिसर रामनामाच्या भक्तीरसात डुंबून गेला. जुने शिरूर येथे पुरातन श्री रामलिंग मंदिर असून, वनवासात असताना प्रभू श्री रामचंद्रांनी या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची उभारणी करून तेथे शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका सर्वश्रूत आहे. खुद्द प्रभू रामरायाचे पदस्पर्श या भूमीला झाल्याचे फार पूर्वीपासून सांगितले जात असल्याने या स्थानाविषयी भाविकांमध्ये विशेष आस्था आहे. श्री रामलिंग मंदिरातील रामजन्मसोहळ्यालाही शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे.

रामनवमीनिमीत्त आज सकाळी शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर गिरी महाराज पाथर्डीकर यांचे रामजन्मावर कीर्तन झाले. जीवनातील सर्व दुःखांवर मात करण्याची आणि आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता रामकथेत असल्याचे ते म्हणाले. गिरी महाराजांच्या किर्तनानंतर, दुपारी बारा वाजता रामलिंग मंदिरातील मुख्य सभामंडपात रामजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. शिवलिंगाजवळ प्रथम श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ही प्रतिमा ठेवल्यानंतर सियावर रामचंद्र की जय च्या ललकाकाऱ्यांनी गाभारा घुमला. रामजन्माच्या गीतांबरोबर महिलांनी पाळण्यातील रामप्रतिमेला झुलविले. 'कौसल्येच्या पोटी राम जन्मला गं', 'राम जन्मला गं सखे राम जन्मला' या गीतांबरोबरच जुन्या ज्येष्ठ महिलांनी काही गवळण गीतेही सादर केली. सुंठवडा व फळांचा प्रसाद वाटून रामजन्माचे स्वागत करण्यात आले.

भाविकांना खिचडीचा प्रसादही वाटण्यात आला. शहरातील पुरातन राममंदिरातही रामजन्माचा सोहळा उत्साहात साजरा झाला. रामनवमीनिमीत्त मंदिरावर रोषणाई केली होती. गेले दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे केवळ पुजाऱ्यांनी रामजन्माचा सोहळा साजरा केला होता. यावेळी मात्र भाविकांची मोठी उपस्थिती होती. समस्त नामदेव शिंपी समाज संस्थेच्या मंदिरातील रामनवमी सोहळ्यात हभप महादेव महाराज धांडे यांचे किर्तन झाले. माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा यांनी रामप्रतिमेचे पूजन केल्यानंतर रामजन्माचा पारंपारिक सोहळा साजरा झाला. माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, विवेक बगाडे, सिद्धेश्वर बगाडे, राजेंद्र बोत्रे, सागर पांढरकामे, साकेत गुजर आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Ramjanma Ceremony In Excitemen At Old Shirur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsSakalshirur
go to top