अष्टविनायक महागणपतीचे मंदिर उघडलं; नियमांचे पालन करण्याचं आवाहन

नागनाथ शिंगाडे
Tuesday, 17 November 2020

अष्टविनायक महागणपतीचे १७ मार्चपासून लॉक डाऊनमुळे बंद असलेले मंदिर तब्बल ८ महिन्यांनी दर्शनासाठी उघडण्यात आले.

तळेगाव ढमढेरे, - रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपतीचे १७ मार्चपासून लॉक डाऊनमुळे बंद असलेले मंदिर तब्बल ८ महिन्यांनी दर्शनासाठी उघडण्यात आले. यामुळे ग्रामस्थ, प्रवासी व भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार महागणपतीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर बंद असल्याने परिसरातील दुकानदार आर्थिक संकटात सापडले होते. दिवाळी पाडवा व भाऊबीज या सणाच्या मुहूर्तावर मंदिर खुले केल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे. महागणपतीचे मंदिर पुणे- अहमदनगर रस्त्यावर येत असल्याने हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येथे थांबतात.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थानतर्फे दर्शनास येणाऱ्या नागरिकांसाठी नियम तयार करण्यात आले असून,  दर्शनास येणाऱ्या नागरीकांची मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच  थर्मल तपासणी व  सॅनिटायझर करण्यात येत आहे. ट्रस्टतर्फे नागरिकांच्या दर्शनासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी मंदिर परिसराची पाहणी करून, विविध सुविधांची माहिती घेतली. सर्वांनी नियमांचे पालन करून महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranjangaon ashtavinayak ganpati mandir open for all