रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात पिंपरीची इलेक्‍ट्रिक जीप (व्हिडिओ)

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात पिंपरीची इलेक्‍ट्रिक जीप (व्हिडिओ)

पिंपरी - जंगल सफारीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे या परिसरातील वनसंपदेला धोका पोचत आहे. या भागातील पर्यावरण सहीसलामत राहावे, म्हणून खास जंगल सफारीसाठी मारुती जिप्सीचा वापर करून प्रथमच इलेक्‍ट्रिक जीप तयार केली आहे. चिंचवडमधल्या ऑटो क्‍लस्टरमध्ये उद्योजक राजीव रणदिवे यांनी ही गाडी तयार करण्याची किमया साधली आहे. 

राजस्थानच्या वनविभागाने या इलेक्‍ट्रिक गाडीला जंगल सफारीसाठी मान्यता दिली असून, रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्ये त्याच्या वापराला सुरवात झाली आहे. 

जंगल सफारीसाठी पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाडीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, याचा परिणाम थेट प्राणी आणि अन्य वनसंपदेवर होत आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ॲथॉरिटीने जंगल सफारीसाठी सोलर किंवा बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वापरण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत. त्यानुसार ही इलेक्‍ट्रिक गाडी तयार केल्याचे रणदिवे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

...अशी आहे जीप
मारुती जिप्सीमध्ये असणारे पेट्रोलचे इंजिन काढून त्या ठिकाणी २० किलोवॉटची इलेक्‍ट्रिक मोटार बसविली आहे. सात युनिटच्या पॉवरमध्ये ही गाडी १०० किलोमीटरपर्यंत चालते. बॅटरीचे जलद चार्जिंग करण्यासाठी दीड तास, तर नॉर्मल चार्जिंग करण्यासाठी आठ तासांचा अवधी लागतो. सात युनिटच्या बॅटरी चार्जिंगसाठी येणारा खर्च ५६ रुपयांच्या आसपास आहे. जीपमध्ये आठ माणसे बसू शकतील. गाडी तयार करण्यासाठी लिथियम बॅटरी, मोटार आणि इलेक्‍ट्रॉनिक सुट्या भागांचा वापर केला आहे.

रणथंबोरच्या जंगलामध्ये या गाडीची यशस्वी चाचणी घेतली आहे. चिखल, दगड, खाचखळगे, पाणी या रस्तावरून ही गाडी फिरवली आहे. वन खात्याने या गाडीच्या चाचणीसाठी वन खाते, परिवहन अधिकारी, पोलिस, पर्यटन, विभागातील सहा जणांची समिती नेमली होती. त्यांनी गाडीला ग्रीन सिग्नल दिला आहे. 

वर्षभरात ७०० गाड्या 
रणथंबोर जंगल सफारीसाठी सुमारे ७०० गाड्या वापरण्यात येतात. पुढील वर्षापर्यंत या सर्व गाड्या इलेक्‍ट्रिकवर करण्यात येणार आहेत. एक गाडी इलेक्‍ट्रिकवर करण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो. रणथंबोरनंतर मध्य प्रदेशमधील कान्हा नॅशनल पार्क परिसरातील गाड्या इलेक्‍ट्रिकवर करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. जंगलात चालणाऱ्या इलेक्‍ट्रिकल कारचे इंजिन विकसित करण्यास २०१४ मध्ये सुरवात केली आणि चार वर्षांत ते विकसित केले. या संपूर्ण इंजिनाची किंमत सात लाख रुपये आहे. 

भारतात ४९५ वाइल्ड लाइफ सेन्चुरी आहेत. जंगलातील पर्यावरणाचा विचार करता या ठिकाणी इलेक्‍ट्रिकल गाडीचा वापर होणे अपेक्षित आहे. देशभरात जंगलामध्ये फिरणाऱ्या गाड्यांची संख्या दहा हजारांपर्यंत असेल. या सर्व गाड्या इलेक्‍ट्रिकवर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आम्ही लवकरच केंद्र आणि विविध राज्य सरकारी यंत्रणांशी संपर्क साधणार आहोत. 
- राजीव रणदिवे, व्यवस्थापकीय संचालक, पिक्‍सी इलेक्‍ट्रिक कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com