शिरूरमध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 5 महिने अत्याचार; दोघांना अटक

नितीन बारवकर
Monday, 26 October 2020

अल्पवयीन मुलीला गेल्या पाच महिन्यांपासून त्रास देत, जीवे मारण्याची धमकी देत तीच्यावर अत्याचार करणा-या दोघा नराधमांना शिरूर पोलिसांनी अटक केली.

शिरूर : अल्पवयीन मुलीला गेल्या पाच महिन्यांपासून त्रास देत, जीवे मारण्याची धमकी देत तीच्यावर अत्याचार करणा-या दोघा नराधमांना शिरूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी आणखी काही संशयितांची नावे पुढे येत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मयुर सदाशिव थोरात (वय २३) व सागर बबन जगताप (वय २४, दोघे रा. आमदाबाद, ता. शिरूर) अशी दोघा आरोपींची नावे असून, शिरूर न्यायालयाने आज त्यांना, शनिवार (ता. ३१) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

गेल्या जून महिन्यापासून थोरात व जगताप हे संबंधित अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी कसून माहिती घेत असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. सध्या दोघांना अटक करून 'पोक्सो' कायद्यानूसार त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक बी. जे. पालवे यांच्यावर पुढील तपासाची जबाबदारी सोपविली असल्याचे त्यांनी सांगितले. 

पालवे यांनी दिलेल्या माहितीनूसार, एक जून रोजी संबंधित पिडीत मुलगी आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. तेथून परतताना, थोरात याने तीला रस्त्यात अडवून माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्या प्रेमाला नकार दिल्यास तुमचे गावातील दुकान पेटवून देईल, अशी धमकी दिली. त्यानंतरही वारंवार त्याने मुलीला अडवून त्रास दिला. २९ जून रोजी, धमकी देत सायंकाळी गावातील शाळेत बोलावून घेतले व अत्याचार केले. मुलीने आरडाओरडा केला असता तेथे असलेल्या सागर जगताप याने तीचे तोंड व हातपाय दाबून धरले.

याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, २८ ऑगस्टलाही पुन्हा जगताप याच्या मदतीने थोरात याने अत्याचार केले. यामुळे घाबरलेली संबंधित मुलगी शांत राहिली. मात्र, तरीही थोरात व जगताप हे तीच्यावर पाळत ठेवू लागले. येता - जाता त्रास देऊ लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकारामुळे घाबरलेल्या पिडीत मुलीने आपल्या नात्यातील एका महिलेला स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाची व होणा-या त्रासाची कल्पना दिली. यादरम्यान, थोरात व जगताप यांना पाहून देखील पिडीता मुलगी घाबरत व रडत असल्याचे संबंधित महिलेच्या लक्षात आल्यावर तीने पिडीत मुलीच्या आई - वडीलांना विश्वासात घेऊन हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेतली. सर्व शहानिशा करून पोलिसांनी मयुर थोरात व सागर जगताप यांच्याविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणात आणखी कुणाचा हात आहे कींवा कसे याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape of a minor girl for 5 months by threatening to kill her at shirur