esakal | Video : दुर्मिळ पक्ष्यांचे संमेलन

बोलून बातमी शोधा

Bird}

इंद्रधनुषी सौंदर्य...चित्तवेधक किलबिलाटाचा नादमधूर झंकार... आकाशी झेपावणारी इवल्याशा पंखांची सुखद फडफड... असे आल्हाददायी मंत्रमुग्ध करणारे वातावरण किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी (ता. हवेली) येथील ‘बर्ड व्हॅली’ परिसरात सध्या मन प्रसन्न करून टाकत आहे.

pune
Video : दुर्मिळ पक्ष्यांचे संमेलन
sakal_logo
By
संतोष खुटवड, पुणे

सिंहगडाच्या पायथ्याशी किलबिलाट; पक्षिप्रेमींसाठी पर्वणी
इंद्रधनुषी सौंदर्य... चित्तवेधक किलबिलाटाचा नादमधूर झंकार... आकाशी झेपावणारी इवल्याशा पंखांची सुखद फडफड... असे आल्हाददायी मंत्रमुग्ध करणारे वातावरण किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी (ता. हवेली) येथील ‘बर्ड व्हॅली’ परिसरात सध्या मन प्रसन्न करून टाकत आहे. येथे सूर्योदय व सूर्यास्तावेळी सुंदरतेचे वरदान लाभलेले डौलदार बुलबुल व चिमणीवर्गीय पक्ष्यांचे जणू संमेलनच सध्या भरत आहे. पुणे व राज्यभरातील पक्षी अभ्यासक, पर्यटक अन् पक्षीप्रेमींसाठी ते पर्वणी ठरत आहे.

‘बर्ड व्हॅली’तील सुमारे विविध प्रकारच्या ६० पक्ष्यांचा येथील पाणथळ व दरीमधील झाडांवर मुक्त संचार दिसून येतो. मानसरोवर, हिमालय व इतर बर्फाळ प्रदेशातून यातील काही पक्षी डिसेंबरमध्ये येतात आणि मार्च किंवा एप्रिलपर्यंत त्यांचा अधिवास असतो. उन्ह्याळ्याची चाहूल लागताच किंवा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवताच ते स्थलांतर करतात. मात्र, यंदा सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पावसाळा अधिककाळ असल्यामुळे त्यांची अन्नसाखळी तुटली नाही. त्यामुळे त्यांचा अधिवास मेपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. सध्या शाही बुलबुल, निलमणी, निलांग, निळी लिटकुरी, गुलाबी चिमणी, नीलशैल कस्तुर हे पक्षी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहेत. अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या या पक्ष्यांचे आकाशात मुक्त विहरणे आणि त्यांच्या मनमोहक अदा कॅमेराबद्ध करण्यासाठी हौशी छायाचित्रकार, निसर्गप्रेमी ‘बर्ड व्हॅली’ला शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी भेट देत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बर्ड व्हॅलीतील पक्षी
देशी : नीलांग, नीलमणी, नीलपरी, तांबूल, नीलशील कस्तूर, पिवळी लिटकुरी, निळी लिटकुरी
स्थानिक : शाही बुलबुल (स्वर्गीय नर्तक), काळ्या डोक्याची चिमणी, सातभाई, पिवळ्या गळ्याची चिमणी, तांबट
परदेशी : गुलाबी चिमणी, राखी डोक्याची चिमणी

या सुविधांची गरज

  • चिमणीवर्गीय पक्ष्यांच्या माहितीचे फलक
  • नैसर्गिक जलस्त्रांतांचे जतन करून त्यांचे संवर्धन
  • व्हॅली व सिंहगड पायथ्यालगत कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती
  • पक्षी अभ्यासक, विद्यार्थ्यांसाठी निसर्ग केंद्र
  • छायाचित्रकार, अभ्यासकांसाठी लपणक्षेत्र

निसर्गाचे वरदान लाभलेल्या बर्ड व्हॅली व सिंहगड परिसरात वन विभागाने पाणवठ्यांचे स्वरंक्षण करून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सिंहगडावर भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या मोटारी व दुचाकींचे अतिक्रमण व्हॅलीत होत आहे. त्यांच्या आवाजामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे.  
 - दत्तात्रेय लांघी, पक्षीमित्र, निसर्गयात्री संस्था, पुणे

सिंहगड- व्हॅली पक्षी आणि इतर वन्य प्राण्यांसाठी उत्कृष्ट निवासस्थान आहे. याला पक्षी छायाचित्रकारांसारख्या मानवी हस्तक्षेपापासून वाचवण्यासाठी तेथे लपन क्षेत्राची (Hides-Tent) गरज आहे. जैवविविधतेच्या पाण्याच्या स्त्रोतासाठी ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर कृत्रिम पाणवठे (कूपनलिका व सौर पंप बसवाला) तयार केले; तर निसर्ग संवर्धनासाठी मोलाची मदत होईल.
- अरविंद बेंद्रे, पक्षी अभ्यासक

Edited By - Prashant Patil