दुर्मिळ माशांचा शोध

दुर्मिळ माशांचा शोध

Published on

किरकसाल परिसरात दुर्मीळ माशांचा शोध

डेक्कन महासीर, कोलूस बार्ब व पाबडा कॅटफिश आढळला; पर्यावरणीय महत्त्व ठळक

गोंदवले, ता. ५ : वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटत असताना करण्यात आलेल्या विशेष नमुना संकलना दरम्यान किरकसाल परिसरातील बंधाऱ्यांमध्ये डेक्कन महासीर, पश्चिम घाटात स्थानिक व असुरक्षित असलेला कोलूस बार्ब व स्थानिक जलपरिसंस्थेत स्वच्छतादाराची भूमिका बजावणारा पाबडा हा कॅटफिश आढळून आला आहे. परिसरात आतापर्यंत माशांच्या बारा प्रजातींच्या नोंदी झाल्या असून, हंगामी जलसाठे दुर्मीळ जलचरांसाठी अत्यावश्यक ‘सूक्ष्म आश्रयस्थाने’ म्हणून कार्यरत असल्याचे सिद्ध होत आहे.
अर्ध कोरड्या माणदेशातील किरकसाल परिसरात जैवविविधता संरक्षण व संवर्धन प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. त्यांतर्गत वन्य अभ्यासकांसह स्थानिकांकडूनही सर्वेक्षण करून वन्यजीव व वनस्पतीच्या नोंदी करण्यात येत आहेत. सध्याच्या तापमानवाढीमुळे परिसरातील पाणीसाठ्यांची पातळी घटत असतानाच प्रकल्पातील अभिजित माने व प्रथमेश काटकर त्यांच्यासह सहकाऱ्यांनी नुकतेच सर्वेक्षण केले. यामध्ये पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या तीन माशांच्या प्रजातींची उपस्थिती नोंदवण्यात आली. त्यामध्ये कृष्णा नदी प्रणालीशी ऐतिहासिकदृष्ट्या निगडित असलेला डेक्कन महासीर, पश्चिम घाटात स्थानिक व असुरक्षित असलेला कोलूस बार्ब व स्थानिक जलपरिसंस्थेत स्वच्छतादाराची भूमिका बजावणारा पाबडा हा कॅटफिश यांचा समावेश आहे.
या नोंदीमुळे किरकसालच्या गवताळ प्रदेशाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक ठळक झाले आहे. हंगामी जलसाठे दुर्मीळ जलचरांसाठी अत्यावश्यक ‘सूक्ष्म आश्रयस्थाने’ म्हणून कार्यरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. कोलूस बार्ब व डेक्कन महासीर हे उरमोडी धरण येथून सुरू होणाऱ्या कालव्यांच्या जाळ्याद्वारे किरकसालमध्ये पोहोचले असावेत, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. जलसिंचनच्या पायाभूत सुविधांमुळे पश्चिम घाटातील संवेदनशील प्रजाती सातारा जिल्ह्याच्या गवताळ प्रदेशात पोहोचत असल्याची ही कार्यात्मक जोड स्थानिक बंधाऱ्यांना जैवविविधतेची केंद्रे बनवत असल्याचेही मत प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत यांच्याकडून व्यक्त होत आहे.
किरकसालच्या स्थानिक जलसाठ्यांत संकटग्रस्त डेक्कन महासीर आणि असुरक्षित कोलूस बार्बच्या निर्णायक नोंदीमुळे परिसर हा पूर्वीच्या समजुतींपेक्षा अधिक गुंतागुंतीचा आणि परस्पर संबंधित परिसंस्थांचा समूह असल्याचे सिद्ध होत आहे. स्वच्छ पाणी व उच्च अधिवास हे आरोग्याचे संवेदनशील निर्देशक असून, ते वन्यजीवांसह स्थानिक मेंढपाळांसाठीही अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.
या संकटग्रस्त जलचरांच्या नोंदीमुळे किरकसाल संवर्धन क्षेत्र राखीव घोषित करण्याच्या प्रयत्नांना शास्त्रीय बळकटी मिळत आहे. संकटग्रस्त माशांसह परिसरात आढळणाऱ्या लांडगा आणि पट्टेरी तरस यांच्या निवासी लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थलज व जलज अधिवासांचे एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक असल्याची बाब यामुळे अधोरेखित होत आहे.

कोट
उन्हाळ्यात पाण्याची पातळी सतत घटत असताना या जलचरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी तातडीच्या संवर्धन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.
- प्रथमेश काटकर आणि अभिजित माने, क्षेत्र सहाय्यक किरकसाल संवर्धन प्रकल्प, किरकसाल.

छायाचित्र - डेक्कन महासीर आणि कोलूस बार्ब मासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com