Radio Transmission : भारतीय शास्त्रज्ञांनी शोधली दुर्मीळ रेडिओ प्रारणे

अवकाशात अणू-रेणूंचे महाकाय ढग एकत्र आले, की गुरुत्वाकर्षण वाढते. त्यातूनच पुढे ताऱ्यांची आणि असंख्य ताऱ्यांतून दीर्घिकांची निर्मिती होते.
Radio Transmission
Radio Transmissionsakal

पुणे - अवकाशात अणू-रेणूंचे महाकाय ढग एकत्र आले, की गुरुत्वाकर्षण वाढते. त्यातूनच पुढे ताऱ्यांची आणि असंख्य ताऱ्यांतून दीर्घिकांची निर्मिती होते. आपल्यासारख्या आकाशगंगेच्या निर्मितीत अवकाशीय वायूंच्या महाकाय ढगांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशाच एका दीर्घिका समूहातील दुर्मीळ रेडिओ प्रारणे शोधण्यास भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे.

इंदूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील स्वर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखालील खगोलशास्त्रज्ञांच्या चमूने ही कामगिरी केली. नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) वापरातून दुर्मीळ रेडिओ प्रारणाचा अस्पष्ट स्रोत शोधण्यास शास्त्रज्ञांना यश आले आहे.

या शोधातून दीर्घिका समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीबद्दल महत्त्वपूर्ण घटनाक्रम कळण्यास मदत होईल. या संशोधनामध्ये आयआयटी इंदूरचे अभिरूप दत्ता, तैवान येथील नॅशनल त्सिंग हुआ विद्यापीठातील माजिदुल रहमान, पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या रुता काळे, मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे डॉ. सुरजित पॉल यांचा सहभाग आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

शास्त्रज्ञांना काय आढळले?

एबेल २१०८ हा कमी वस्तुमान असलेला दीर्घिका समूह आहे, ज्यामध्ये दक्षिणेकडील भागात रेडिओ प्रारण आधी आढळले होते. चटर्जी यांच्या समूहाने आकाशगंगा समूहाच्या उत्तरेला आणखी एक अस्पष्ट रेडिओ रचना शोधली आहे.

त्यामुळे हा समूह दुर्मीळ दुहेरी रेडिओ अवशेष असलेला म्हणून ओळखला जाईल. नव्याने सापडलेली रचना दक्षिणेकडील अवशेषाच्या दुप्पट मोठी आहे. तसेच आतापर्यंत सापडलेल्या सर्वांत कमी शक्ती असलेल्या रेडिओ अवशेषांपैकी एक आहे.

...असे निर्माण झाली रेडिओ प्रारणे

दीर्घिकांचा समूह ही विश्‍वातील सर्वांत मोठी गुरुत्त्वाकर्षणाने बांधलेली रचना मानली जाते. यामध्ये सूर्याच्या वस्तुमानाच्या हजार ट्रिलियनपट जास्त वस्तुमान असते. या समूहांमधील विद्युतभारित कण दोन समूहांच्या टकरीमध्ये ऊर्जावान होतात. ऊर्जावान कण चुंबकीय क्षेत्रामध्ये रेडिओ वर्णपटात ‘सिंक्रोट्रॉन’ रेडिएशन उत्सर्जित करतात.

संशोधनाचे महत्त्व

  • चुंबकीय क्षेत्रे, वैश्‍विक किरणे आणि त्यांच्यातील परस्परसंवाद समजून घेण्यात मदत

  • दीर्घिका समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीबद्दल माहिती मिळेल

  • कमी-वस्तुमान असलेल्या दीर्घिका समूहांमध्ये रेडिओ उत्सर्जनाचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण उपयोगी

रेडिओ स्रोताबद्दल

  • पृथ्वीपासूनचे अंतर २० लाख प्रकाश वर्षे

  • दीर्घिका समूह एबेल २१०८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com