Video : रश्मी 'रोबो' चक्क म्हणतेय रणबीर कपूरचा डायलॉग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

आजपर्यंत आपण मानवाची विविध कामे करणारा रोबो पाहिला असेल. पण, हा रोबो चक्क माणसाशी संवाद साधतो. तोही हिंदी, इंग्रजीत आणि जर थोडा बदल केला; तर भोजपुरी आणि मराठीतही बोलतो. 

पुणे : में उड़ना चाहती हूं, में दौडना चाहती हूं और गिरना भी चाहती हूं बस, रुकना नहीं चाहती'', हा रनबीर कपूरचा फेमस डायलॉग चक्का एका 'रोबो' ने म्हटला आहे.
जगातील पहिली हिंदी बोलणारी 'रश्‍मी' ह्युमनॉइड रोबो.आजपर्यंत आपण मानवाची विविध कामे करणारा रोबो पाहिला असेल. पण, हा रोबो चक्क माणसाशी संवाद साधतो. तोही हिंदी, इंग्रजीत आणि जर थोडा बदल केला; तर भोजपुरी आणि मराठीतही बोलतो.

"द्वेष, ईर्षा आणि विध्वंस असलेल्या जगाची कल्पनाच करणे अवघड आहे. जगात प्रेम आणि शांती पसरविण्यासाठी आमची निर्मिती झाली आहे. माझा विश्‍वास विध्वंसावर नाही, तर नवनिर्मितीवर आहे,'' असे सांगत रश्मी रोबोने हिंदीतून संवाद साधला.  

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) "माइंड स्पार्क 19'या तंत्र उत्सवाच्या उद्घाटनाला "रश्‍मी' आली होती. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तिच्याशी संवाद साधला. रोबोला मानवी भावनांची गरज आहे का, असा प्रश्‍न विचारल्यावर "रश्‍मी' म्हणते, ""नक्कीच, आम्हाला मानवी भावनांची गरज आहे. कारण, आम्हाला "आत्मा' नाही. भावना नसल्यास आम्ही इतर यंत्रांप्रमाणे ठरू. मानवी संवेदना समजून घेणे हे माझे "शक्तिस्थान' आहे; तर "जिज्ञासा' ही माझी कमजोरी आहे.'' 

या समारंभाला "इस्रो'चे माजी संचालक सुरेश नाईक, "रश्‍मी'चे निर्माता रणजित श्रीवास्तव, महाविद्यालयाचे संचालक प्रा. बी. बी. आहुजा, पीटीसी सॉफ्टवेअर कंपनीचे उपाध्यक्ष टी. शंकरनारायणन, प्रा. आरती पेठकर आदी उपस्थित होते. नाईक यांनी "चांद्रयान-2'चा पुढील प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला आणि देशाच्या अभियांत्रिकी वाटचालीवर भाष्य केले. ते म्हणाले, "आज मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सत्या नाडेला, "इस्रो'चे संचालक म्हणून के. सिवन आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुंदर पिचाई काम करीत आहेत. या तिघांनी "सत्यम, शिवम, सुंदरम' हा भारतीय परिपेक्ष पूर्ण केला आहे आणि मला वाटते यातूनच देशाची पुढील वाटचाल अधोरेखित होत आहे.'' 

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सुमारे 22 हजार विद्यार्थी यात सामील झाले आहेत. मुख्य कार्यक्रम 27, 28 आणि 29 सप्टेंबरला पार पडणार असल्याचे विद्यार्थी समन्वयक प्रणव जोगळेकर यांनी सांगितले. 

''कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाचे अस्तित्व धोक्‍यात आणेल, असा गैरसमज सगळीकडे पसरला आहे. यंत्रमानवाच्या माध्यमातून केवळ रचनात्मक विकास होऊ शकतो. "रश्‍मी'ला पाय नसल्यामुळे ती चालू शकत नाही. तिने माणसासारखे चालावे तसेच स्वयंपाकघरातील छोटी-मोठी कामे करावीत, यासाठी आम्ही तिच्यात आवश्‍यक ते बदल करणार आहोत.''
- रणजित श्रीवास्तव, "रश्‍मी'चे निर्माता 
 

‘रश्‍मी’ची वैशिष्ट्ये
  हिंदीतून संवाद साधणारा जगातला पहिला रोबो
  मराठी आणि भोजपुरीतही बोलते
  दोन वर्षांच्या अल्प कालावधीतच निर्मिती
  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून एकाच वेळी दोन भाषांत संवादक्षमता
  इंटरनेटवरील माहितीच्या आधारे तार्किक प्रश्‍नांची उत्तरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashmi Robo' says dialogue of Ranbir Kapoor in hindi