कोरोना काळात १० लाख कुटुंबांना केली मदत - राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

कोरोनाचा संसर्ग, टाळेबंदी व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने करण्यात मदतकार्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लाभ 10 लाखांहून अधिक कुटुंबांना झाला असल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.

पुणे : कोरोनाचा संसर्ग, टाळेबंदी व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने करण्यात मदतकार्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लाभ 10 लाखांहून अधिक कुटुंबांना झाला असल्याची माहिती आरएसएसने दिली. रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, प्रांत सेवा विभाग प्रमुख अनिल व्यास, सहप्रमुख शैलेंद्र बोरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनलॉकनंतर या सेवाकार्यांच्या स्वरूपात बदल करण्यात आलेला असून सध्या रा.स्व. संघाच्या सेवा विभागाच्या माध्यमातून प्रमुख चार क्षेत्रात समाज पुनर्बांधणीचे काम गतीने सुरू आहे. एक हजार 556 गावांमध्ये चार हजार 817 स्वयंसेवक, कार्यकर्ते शंभरहून अधिक दिवसांपासून विविध सेवा कार्य करीत आहेत. संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतात पुणे महानगर, पिंपरी-चिंचवडसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक हे जिल्हे येतात. तेथील सेवाकार्याची माहिती देणाऱ्या `व्रत सेवेचे` या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

दबडघाव म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग सुरू होऊन रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मार्च महिन्यातच प्रांतभरातील प्रमुख शहरांसह सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीपर्यंत रा.स्व. संघातर्फे विविध स्वरूपाची मदत गरजू व सामान्य नागरिकांपर्यंत तातडीने पोहचेल यादृष्टीने सेवा कार्य हाती घेण्यात आली. संघाने केलेल्या आवाहनानुसार पश्चिम महाराष्ट्रात अनेकविध सामाजिक संस्था आणि त्यांचे शेकडो कार्यकर्तेही या काळात उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि त्यांनी विविध कामांना भरभरून साह्य केले."

वंजारवाडकर यांनी सांगितले, की कोरोनाचा संसर्ग कमी होऊन केंद्र व राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर या मदतकार्याचे स्वरूप गरजेनुसार आता बदलण्यात आले आहे. समाजातील सामान्य माणसाला सर्वोतोपरी मदत व समाजाच्या एकूणच पुनर्बांधणीची गरज लक्षात घेऊन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षण या विषय क्षेत्राच्या माध्यमातून सेवा कार्य प्रांतभर सुरू असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करते आहे. सर्व समाजाच्या मदतीने हे अभियान सुरू आहे. यासोबतच नागरिकांची मनःस्थिती ठीक राहावी यासाठी विविध विषयांच्या अनुषंगाने समुपदेशाची योजना देखील हाती घेण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मदतकार्य 

- नऊ लाख 40हजार नागरिकांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ
- तीन लाख  25 हजार कुटुंबांना धान्य पिशव्यांचे वितरण
- दोन लाख 50 हजार जणांना मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हजचे किटचे वाटप
- 24 हजार 967 रक्त पिशव्यांचे संकलन
-  दोन हजार दात्यांचे प्लाझ्मादान
- एक लाख 16 हजार नागरिकांचे स्क्रीनिंग
- 52 हजार घरांमधील एक लाख 15 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
- पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मदत, 
- 22 हजार महिलांची आरोग्य तपासणी
- 11 लाख औषधी गोळ्यांच्या डब्यांचे वाटप
- 65 हजार नागरिकांचे समुपदेशन
- एक लाख 40 हजार अन्य राज्यातील नागरिकांना विविध प्रकारची मदत
- एक लाख 10 हजार घरी परतणाऱ्या नागरिकांना आवश्‍यक सहाय्य
- सात हजार 400 ट्रकचालकांना सहाय्य
- दोन हजार दुर्गम भागातील घरांपर्यंत धान्य पिशव्यांची मदत
- एक हजार भटक्या-विमुक्त कुटुंबांना त्यांच्या पालांवर जाऊन मदत
- विविध सेवाकार्यामध्ये शहरांमधील आणि गावांमधील मिळून 
चार हजार 817 कार्यकर्ते, स्वयंसेवकांचा सहभाग
- कार्यकर्त्याचा कामातील सहभाग तब्बल 100 दिवस
- एक हजार 556 गावांमध्ये विविध प्रकारची सेवाकार्ये राबविली

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashtriya swayamsevak sangh helps 1 million families during Corona period, claimed at the press conference