जमनापुरी, खस्सी, गावरान बोकडांना भाव

प्रसाद पाठक 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - जमनापुरी, बरबरा, तोतापुरी, खस्सी, अंडूल आणि देशी गावरान जातीच्या बोकडांचे भाव बकरी ईदनिमित्त वधारले आहेत. दोन ते चार वर्षांच्या बोकडाला आठ हजारांपासून २५ हजारांपर्यंत भाव आला आहे. दिवसाला पाचशे ते सहाशे बोकडांची विक्री होत आहे. 

पुणे - जमनापुरी, बरबरा, तोतापुरी, खस्सी, अंडूल आणि देशी गावरान जातीच्या बोकडांचे भाव बकरी ईदनिमित्त वधारले आहेत. दोन ते चार वर्षांच्या बोकडाला आठ हजारांपासून २५ हजारांपर्यंत भाव आला आहे. दिवसाला पाचशे ते सहाशे बोकडांची विक्री होत आहे. 

भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार बोकडाच्या खरेदी- विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या ऐंशी वर्षांपासून येथे बकरी ईदनिमित्त बोकडांचा बाजार भरतो. बकरी ईद २२ ऑगस्टला असल्याने दहा ऑगस्टपासूनच येथे बाजार भरला आहे. परराज्यांतून विक्रेत्यांनी वेगवेगळ्या जातींचे बोकड विक्रीसाठी आणले आहेत. साधारणतः चाळीस ते पन्नास हजार रुपयांची उलाढाल दरवर्षी या बाजारात होते. विक्रेते दत्तात्रेय घोडके म्हणाले, ‘‘कोणी गावरान बोकड खरेदी करते, तर कोणी खस्सी, अंडूलला पसंती देतात. खस्सी आणि अंडूल जातींच्या बोकडास दहा ते पंचवीस हजारांपर्यंतही भाव मिळतो. ईदसाठी आम्ही मध्य प्रदेश, बोरगाव, चाकण, यवत तसेच पुणे जिल्ह्यातल्या खेडेगावांतूनही बोकड खरेदी करतो.  कोणी एक, दोन, चार, दहा अशा प्रमाणात बोकडांची मागणी करतात. त्यानुसार बोकडांची विक्री करतो.’’ 

विक्रेते विनायक नकाते म्हणाले, ‘‘दोन दात असलेला बोकड हा अठरा महिन्यांचा किंवा दोन वर्षांचा असतो, तर तीन ते चार दात आलेला बोकड अडीच ते तीन वर्षांचा असतो. साधारणतः तीस किलो वजनाचा बोकड असतो. बोकडाला भाव चांगला यावा, यासाठी त्याला शेवरी, मका, वडाचा व उंबराचा पाला, सुबाभूळ, कडबा कुट्टी खायला घालतो. जेवढा बोकड वजनदार, तेवढा त्याला चांगला भाव येतो. गिऱ्हाइक चवीसाठी गावरान बोकड अधिक खरेदी करतात.’’  

Web Title: rate for Gavaran goats