
पुणे - लॉकडाउनमध्ये मुंबईपेक्षा पुण्याला रामराम ठोकणाऱ्या राज्यांतर्गत श्रमिकांनी संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यातून 38 टक्के तर, मुंबई आणि उपनगरांमधून 23 टक्के कामगार मराठवाड्यात परतले. पुण्यातून परतलेल्या श्रमिकांपैकी 43 टक्के मराठवाड्यातील असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून निघाला. पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या 46 टक्के विद्यार्थ्यांनीही पुणे सोडले आहे.
राज्यात मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना उद्रेकाला नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन सुरू करण्यात आला. त्यानंतर श्रमिक राज्याबाहेर जाऊ लागले. पण, त्याच बरोबर राज्यांतर्गत श्रमिकांचे स्थलांतरही वेगाने झाले. त्याचा अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील सार्वजनिक धोरण आणि लोकशाही शासन व्यवहार अभ्यास केंद्र आणि द युनिक फाउंडेशनतर्फे करण्यात आला. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.
शहरात परतण्याचा आशावाद
अर्धकुशल व अकुशल अशा श्रमिकांनी कोरोनाच्या भीतीबरोबरच वेतन बंद झाल्याने आणि नोकरी गेल्याने गावी परत गेले. परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यांत गेल्याने निर्माण झालेल्या नवीन संधी स्वीकारण्याचा आणि पुन्हा शहरात परतण्याचा आशावादही राज्यातील कामगारांमध्ये असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.
रोजगारक्षम भागात कोरोनाचा संसर्ग
सहाव्या आर्थिक गणनेनुसार राज्यातील एकूण रोजगारांपैकी सुमारे 70 टक्के रोजगार हा मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी भागांतच केंद्रित आहे. हा भागच कोरोना बेल्ट बनल्याने कामगारांसमोर पेच निर्माण झाले.
कोरोना उद्रेकामुळे उलट स्थलांतर
रोजगाराच्या निमित्ताने शहरांकडे स्थलांतर होत असल्याचे सामान्यतः दिसते. पण पुण्यात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे उलट स्थलांतर झाल्याचे 5 ते 20 जून या दरम्यान केलेल्या अभ्यासातून दिसून येते. पुणे आणि मुंबई परिसरातून आपापल्या गावी जाणाऱ्या कामगारांचे प्रमाण अधिक दिसून आले. पुणे जिल्ह्यातून 38 टक्के तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांतून 23 टक्के कामगार परत गावात आल्याचे सर्वेक्षणातून दिसते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत स्थलांतरित झालेले श्रमिक परतले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यांतर्गत स्थलांतराचे वैशिष्ट्य
- पत्नी आणि मुलांसह स्थलांतर
- कुटुंबीयांसमवेत राहण्याचे प्रमाण 63 टक्के
- एकटेच राहणाऱ्यांचे प्रमाण 27 टक्के
- शहरात पती आणि पत्नी दोघेही काम करणाऱ्यांचे प्रमाण 53 टक्के
- 50 टक्के कामगार तीन वर्षांहून अधिक काळापासून वास्तव्य
- 77 टक्के कामगारांकडे स्वतःच्या मालकीचे घर नाही
उलटं स्थलांतराचा हा अभ्यास कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. मात्र, राज्यातील किंबहुना देशातील शहरी केंद्रांची प्रत्यक्षातील व्यवस्थेत रोजगाराच्या जेमतेमच संधी निर्माण होतात. त्यामुळे तकलादू झालेल्या शहरांच्या अर्थव्यवस्थेतून श्रमिकांना सातत्याने स्थलांतर करणे अपरिहार्य झाल्याचे दिसते.
- डॉ. राजेश्वरी देशपांडे, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर
शेती क्षेत्रातील पेच आणि रोजगाराच्या संधी अभावी मागास जिल्ह्यांतून स्थलांतर होत आहे. पुणे परिसर आणि मुंबई शहर व मुंबई उपनगरांतून सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्थलांतरित उत्तरदात्यांपैकी 53 टक्के श्रमिक हे मराठवाड्यातील आहेत. त्यात पुणे शहरातून गावी आलेल्यांची संख्या 43 टक्के इतकी आढळून आली. यावरून स्पष्ट होते की, मराठवाड्यातून मोठ्या शहरांत होणारे स्थलांतर अधिक आहे.
- डॉ. विवेक घोटाळे, कार्यकारी संचालक, द युनिक फाउंडेशन
(Edited by : Kalyan Bhalerao)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.