esakal | रेशन दुकानदारांचा संप स्थगित, रेशन दुकाने आजपासून उघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

रेशन दुकानदारांचा संप स्थगित, रेशन दुकाने आजपासून उघडणार

रेशन दुकानदारांचा संप स्थगित, रेशन दुकाने आजपासून उघडणार

sakal_logo
By
अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना कालावधीत सरकारने विमा संरक्षण कवच द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या रेशन दुकानदारांनी बुधवारी संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवार (ता. ६) पासून रेशन दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजनेतील आर्थिक दुर्बल घटकांमधील शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी तीन-तीन किलो गहू आणि दोन-दोन किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.

राज्य सरकारने रेशन दुकानदारांना कोरोना कालावधीत विमा संरक्षण कवच द्यावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धान्य वितरित करताना इ-पॉस मशिनवर शिधापत्रिकाधारकांच्या ऐवजी रेशन दुकानदाराच्या बोटाचा ठसा घ्यावा, यासह विविध मागण्या रेशन दुकानदार संघटनेकडून करण्यात आल्या होत्या. या मागण्यांसाठी पुण्यासह राज्यातील रेशन दुकानदार एक मेपासून संपावर गेले होते. त्यामुळे बुधवारी पाचव्या दिवशीही रेशन दुकाने बंदच होती.

हेही वाचा: किरकटवाडी-खडकवासल्यात केंद्रांवर तुफान गर्दी

कोरोनाच्या कालावधीत गरीब नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान योजनेतंर्गत मे आणि जून महिन्यात मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राज्य सरकारने मे महिन्याचे धान्य मोफत देण्याची घोषणा केली आहे. संप स्थगित झाल्यामुळे गरीब नागरिकांना धान्य उपलब्ध होणार आहे.

इ-पॉस मशिनवर शिधापत्रिकाधारकांच्या ऐवजी रेशन दुकानदाराच्या बोटाचा ठसा घेउन धान्य वाटपास मान्यता मिळाली आहे. रेशन दुकानदारांच्या इतर प्रलंबित मागण्याही पूर्ण करण्याबाबत राज्य सरकारने आश्वासन दिले आहे. तसेच, कोरोनाच्या कालावधीत शिधापत्रिकाधारकांना त्रास होऊ नये, यासाठी संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतील मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे.

- गणेश डांगी, शहराध्यक्ष- रेशन दुकानदार संघटना, पुणे

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा