रावेत, आकुर्डीला अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंगचा वेढा
रावेत, ता.३ : पिंपरी चिंचवडमधील वेगाने विकसित होणारा रावेत आणि आकुर्डी परिसर सध्या अतिक्रमणाच्या वेढ्यात सापडला आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यांसह पदपथांवरही फळ-भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते आणि छोट्या दुकानदारांनी ताबा मिळवला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आकुर्डीतील विठ्ठल मंदिर, दत्तवाडी, निगडी चौक ते पवळे पूलमार्गे प्राधिकरणाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अतिक्रमणांनी वेढला गेला आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर ते भोंडवे कॉर्नर या मार्गावरही पदपथांचा वापर आता व्यवसायासाठी केला जात आहे. रावेतमध्येही हीच परिस्थिती असून रावेत पंपिंग स्टेशन ते मुकाई चौक आणि भक्ती-शक्ती ते मुकाई चौक या मुख्य रस्त्यांवर व्यावसायिकांनी रस्ते व्यापले आहेत. म्हस्के चौक ते एस.बी.पाटील महाविद्यालय रस्ता आणि शिंदे वस्ती रस्त्यावरही दुकानांच्या समोर होणाऱ्या वाढीव अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.
अपघातांना निमंत्रण
या परिसरात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था आणि आयटी कंपन्या असल्याने वाहनांची वर्दळ मोठी असते. मात्र, रस्त्याच्या कडेला लागलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हातगाड्या आणि ग्राहकांच्या बेशिस्त पार्किंग यामुळे ‘पिक अवर’ मध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. पदपथावर अतिक्रमण असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
कारवाईनंतरही अतिक्रमण
महानगरपालिकेने काही वेळा कारवाई केली असली, तरी कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच हे पथारीवाले पुन्हा आपले बस्तान मांडतात. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रावेत आणि आकुर्डीतील ही समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त आणि कडक दंडात्मक कारवाईची मागणी नागरिक करत आहेत. महापालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजाराम सरगर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
रावेतमध्ये गेल्या दोन वर्षांत लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. पण, रस्ते मात्र अतिक्रमणांमुळे लहान होत आहेत. मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्यावर दोन व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात असतात. एकवेळी जाणेही कठीण होते. प्रशासनाने केवळ एकदा कारवाई करून उपयोग नाही, तर ही जागा कायमस्वरूपी मोकळी केली पाहिजे.
- सुधीर पाटील, रहिवासी, रावेत
आकुर्डी रेल्वे स्टेशनपासून घरापर्यंत चालत जाणे आता अशक्य झाले आहे. पदपथावर भाजीपाला विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे आम्हाला रस्त्यावरून चालावे लागते. मागून येणाऱ्या वाहनांची सतत भीती वाटते. त्यातच रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत अर्धा-अर्धा तास अडकून पडावे लागते. ही परिस्थिती खूपच त्रासदायक आहे.
- अश्विनी गायकवाड, नोकरदार महिला, आकुर्डी
एस.बी.पाटील महाविद्यालयाच्या रस्त्यावर म्हस्के चौकापासून ते शिंदे वस्तीपर्यंत खाऊगल्ल्यांसारखी परिस्थिती झाली आहे. विद्यार्थ्यांची वर्दळ जास्त असूनही वाहने लावून रस्ता अडवला जातो. पदपथ नावापुरते उरले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी.
- मयूर शेलार, विद्यार्थी
अतिक्रमण झालेल्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांना दंड आकारणी करणे आणि जॅमर लावून कारवाई केली जाते. मुकाई चौक येथील बस डेपो मुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हा बस डेपो येथून हलवल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
- विजय वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

