

संजय चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
रावेत, ता. १ : रावेत, किवळे, मामुर्डी आणि आकुर्डी हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. पण, येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. महापालिकेकडून पाणीपुरवठा नियमित आणि पुरेसा होत नाही. त्यामुळे अनेक सोसायट्यांना वर्षभर टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. येथील नागरिक मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर सर्व कर पूर्णपणे वसूल केले जातात. पण, पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
या भागांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. तसेच लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा यंत्रणा अद्ययावत करण्यात आलेली नाही. अनेक सोसायट्यांमध्ये आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवसच कमी दाबाने पाणी येते. तर, काही ठिकाणी पाणी येतच नाही. परिणामी, नागरिकांना टॅंकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी दरमहा हजारो रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
‘‘आम्ही अनेक वेळा पालिका ‘सारथी’ अॅप, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र, बहुतांश वेळा तात्पुरती उपाययोजना केली जाते किंवा टॅंकरची व्यवस्था करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो,’’ अशी नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांकडून गंभीर आरोप
‘‘रावेत, किवळे, मामुर्डी, आकुर्डी आदी भागांत अपुरे पाणी येताच हे टॅंकरचालक पाण्याचे भाव वाढवतात,’’ असा नागरिकांचा आरोप आहे. ‘‘काही ठराविक जलस्रोतांवर मक्तेदारी निर्माण करून टॅंकरची आवक-जावक नियंत्रित केली जाते. त्यामुळे मागणी वाढली की दर थेट दुप्पट-तिप्पट केले जातात. या नफेखोरीतून काही दलाल, चालक आणि जलस्रोत मालक यांची साखळी तयार झाली आहे,’’ असा नागरिकांचा आरोप आहे.
अनेक सोसायट्यांमध्ये नळ जोडणीचे पाइप छोटे आहे. दाब कमी असल्याने पाण्याची आवक कमी होते. अनेक ठिकाणी गळती आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अनेक भागांत अडचण आहे. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या भावावर कोणाचेही नियंत्रण नाही.
- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष सोसायटीत फेडरेशन, रावेत-किवळे
महापालिकेचा पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे महिन्याला १५ ते २० टॅंकर मागवावे लागतात. याचा आर्थिक बोजा थेट रहिवाशांवर पडतो. आम्ही वेळेवर सर्व टॅक्स भरतो, तरी पाण्यासाठी टॅंकर का घ्यावा लागतो?
- अजय पाटील, रावेतमधील एका सोसायटीचे सचिव
नवीन आणि जुन्या दोन्ही सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते. पाणी साठवण्यासाठी मोठ्या टाक्या, मोटारी आणि टॅंकर यावर अवलंबित्व वाढल्याने वीज खर्चही वाढतो.
- वर्षा मोरे, रहिवासी, किवळे
पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. सोसायट्यांसह सर्वांना महापालिकेच्या नियमानुसार पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी अधिक पाण्याची मागणी असते. मात्र, सर्वांना समान पुरवठा केला जातो. नागरिक वाढल्यामुळे आणि पाण्याच्या अधिक वापरामुळे काही ठिकाणी अपवादात्मक टॅंकर पुरवठा होत असेल.
- राजाराम सरगर, सहाय्यक आयुक्त, ‘ब’ प्रभाग
नागरिकांचे प्रश्न
कर नियमित भरूनही पाणी विकत का घ्यावे?
टॅंकर लॉबीवर कठोर नियंत्रण का नाही?
पाणी ही जीवनावश्यक गरज असून त्याचा काळाबाजार का?
सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रशासन प्रयत्न का करत नाही?
पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण का नाही?
कायमस्वरूपी जलस्रोत, नवीन जलवाहिनी याकडे दुर्लक्ष का?
पाणी क्षमता आणि टॅंकरचे भाव
१० हजार लिटर - १ हजार रुपये
२० हजार लिटर - २ हजार रुपये
५० हजार लिटर- ५ हजार रुपये
(हे भाव सरासरी आहेत. मागणीनुसार भाव वाढ केली जाते)
PNE26V81500
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.