करिअरिस्टिक विद्यार्थ्यांसाठी ‘एडविजो’ 

यशपाल सोनकांबळे 
शनिवार, 7 जुलै 2018

दहावी व बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, कोणता अभ्यासक्रम, शैक्षणिक संस्था निवडाव्यात, असे अनेक प्रश्‍न विद्यार्थी व पालकांना पडतात. रवी निशांत यांनी ‘एडविजो’ या स्टार्टअपच्या माध्यमातून ॲप विकसित करून प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिली आहे. 

तुम्ही भविष्यात करिअर कोणते निवडावे, कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये नेमका कोणता अभ्यासक्रम निवडावा यासाठी तज्ज्ञांचे समुपदेशन, शिक्षण संस्थांचे मानांकन किती आहे, अभ्यासक्रमनिहाय शुल्क किती व कसे भरायचे, याची संपूर्ण माहिती आता स्मार्टफोनवर मिळू शकणार आहे. शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट आणि फसवणूक होऊ नये, यासाठी गुवाहाटी आयआयटीचे विद्यार्थी रवी निशांत यांनी ‘एडविजो’ स्टार्टअप सुरू केले. हैदराबाद, पाटणा, जयपूरनंतर आता पुणे आणि मुंबईमध्ये स्टार्टअप यशस्वीरीत्या कार्यरत झाले आहे. 

या संदर्भात ‘एडविजो’ स्टार्टअपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवी निशांत ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘दहावी किंवा बारावीनंतर मुलांना कोणता अभ्यासक्रम द्यायचा, त्यासाठी किती शुल्क आहे, शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या नेमक्‍या किती संधी आहेत, याची चिंता पालक आणि विद्यार्थ्यांना असते. सध्या शिक्षण संस्थांकडून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करून घेण्यासाठी सर्व माध्यमांमधून जाहिरातींचा भडिमार केला जातो. आकर्षक माहितीपुस्तिका, खोटी माहिती देऊन विद्यार्थी आणि पालकांना फसविण्यात आल्याच्या कित्येक घटना दरवर्षी घडत असतात. मी गुवाहाटी आयआयटीमध्ये शिकत असताना शिक्षण संस्थांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही करता येईल का, याचा विचार करीत होतो. त्या वेळी मला ‘एडविजो’ची कल्पना सुचली. ’’

या स्टार्टअपच्या सुरवातीबद्दल रवी निशांत सांगतात, ‘‘मला अभियांत्रिकी शिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी पूर्णवेळ ‘एडविजो’वर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. शिक्षणसंस्थांची आकडेवारी, मानांकन, अभ्यासक्रम, उपलब्ध सुविधा, शुल्क, कोचिंग क्‍लासेसची सुविधा यांची माहिती संकलित करून एकाच ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर देण्यासाठी ‘एडविजो’ संकेतस्थळ व ॲप विकसित केले. आतापर्यंत देशातील १ हजार ७०० हून जास्त शिक्षण संस्था ‘एडविजो’मध्ये नोंदणीकृत आहेत. तब्बल ५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सेवेचा लाभ घेतला आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयएम, माजी सनदी अधिकारी अशा बारा तज्ज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना सुरू केले आहे, तसेच नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमांसाठी ई-पेमेंटची सुविधा देखील सुरू केली आहे.’’

पुणे आणि मुंबई विभागाचे बिझनेस डेव्हलपर मॅनेजर निहाल नितनवरे म्हणाले, ‘‘पुण्यातील १५० शिक्षण संस्था आणि कोचिंग क्‍लासेस ‘एडविजो’शी संलग्न आहेत. त्यामध्ये ५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी आणि चौकशी संकेतस्थळ व ॲपवरून केली आहे.’’

‘एडविजो’ची वैशिष्ट्ये  - 
प्ले-स्टोअरवर उपलब्ध.
एक हजार ७००पेक्षा जास्त शिक्षण संस्था.
अभ्यासक्रम निवडीसाठी शैक्षणिक संस्थांचे मानांकन.
बारा तज्ज्ञांचे ऑनलाइन समुपदेशन व मार्गदर्शन. 
प्रवेशासाठी ई-पेमेंटची सुविधा. 
सर्व सेवा-सुविधा मोफत.

Web Title: ravi nishant startup