पुणे - आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या पथकांकडून १ मार्चपासून दीड कोटीपेक्षा अधिक बालकांची राज्यस्तरीय आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ आज औंध येथे एका शाळेत होणार आहे.
मात्र, ज्या बालकांची तपासणी आरबीएसकेच्या डॉक्टरांच्या पथकांच्या खांद्यावर आहे त्या राज्यातील १२०० पथकांचा दोन महिन्यांचा पगारच झाला नाही. दुसरीकडे मात्र, आरोग्य विभाग या तपासणी मोहिमेसाठी लाखो रुपयांची मुक्तहस्ते उधळण करत असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.
राज्यातील ० ते १८ वयोगटातील दीड कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ एका मेळाव्याद्वारे आज १ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूलमध्ये होणार आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला इतरही मंत्री व नेत्यांना आमंत्रित केले आहे.
या मोहिमेअंतर्गत मार्चअखेर प्रत्येक बालकाची रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग ई. सर्वांगीण तपासणी करण्याचा मानस आहे. नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखून आवश्यकतेनुसार त्वरित उपचार व शासकीय व ‘आरबीएसके’ तसेच ‘एमजेपीजेएवाय’ अंगीकृत रुग्णालयांमध्ये निःशुल्क संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
इव्हेंटगिरीला अच्छे दिन...
वास्तविकतः या बालकांची नियमित तपासणी होत असते. मात्र, तरीही पुन्हा तीच तपासणी करण्याचा एकप्रकारे ‘इव्हेंट’ चा घाट घातला जात आहे. त्यातच, या मोहिमेचे उद्घाटन तालुका, जिल्हा तसेच राज्य स्तरावर करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ३ हजार व १५ हजार रुपये निधीही देण्यात येणार आहे.
तसेच औंधमधील कार्यक्रमाच्या ‘इव्हेंट’ चे कंत्राट ६० ते ७० लाखांना दिल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे ज्या डॉक्टर, परिचारिका, औध निर्माण अधिकारी यांच्या जिवावर हा कार्यक्रम होणार आहे ते मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत असल्याचा विरोधाभासाची ‘किमया’ आरोग्य विभागाने करून दाखवली आहे. त्यावर आरोग्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे समजणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील ‘आरबीएसके’ च्या डॉक्टरांचा पगार झालेला नाही. याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथु श्रीरंगा नायक यांना निवेदन दिले आहे. गेल्या चार महिन्यांपासून पगार उशिरा होत आहे. त्यावर तोडगा काढावा.
- हर्षल रनवरे, समिती प्रमुख, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.