महिला नेतृत्वाने स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडावी - प्रतिभा पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

‘कर्तृत्वाच्या उत्तुंग कक्षा ओलांडणारी स्त्री हिंसेची, अत्याचाराची बळी ठरते आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर सर्व क्षेत्रांतील महिला नेतृत्वाने स्त्रीविषयक समस्यांना आपला आवाज द्यावा. निर्भय, नितळ वातावरणात स्त्रीला संधी द्या, ती तिची अलौकिक गुणवत्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही,’’ असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले.

पुणे - ‘कर्तृत्वाच्या उत्तुंग कक्षा ओलांडणारी स्त्री हिंसेची, अत्याचाराची बळी ठरते आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर सर्व क्षेत्रांतील महिला नेतृत्वाने स्त्रीविषयक समस्यांना आपला आवाज द्यावा. निर्भय, नितळ वातावरणात स्त्रीला संधी द्या, ती तिची अलौकिक गुणवत्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही,’’ असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले. 

भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दंतवैद्यक आणि नेतृत्व परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्ष विजयमाला कदम, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन बर्वे, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. अस्मिता जगताप, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. वीरा भोसले व्यासपीठावर उपस्थित होते.

कदम म्हणाल्या, ‘‘आज मुलींना दंतवैद्यक हे उत्तम करिअर वाटते. दंतरोपण, स्माईल डिझाईन यांसारख्या उपचार पद्धतींच्या कितीतरी पुढचा पल्ला या क्षेत्राने आज गाठला आहे. तुलनेने कमी जोखमीचा आणि आपले आवडीचे काम करत सांभाळता येईल, असा हा व्यवसाय मुलींसाठी देश विदेशांत विपुल संधी निर्माण करणारा ठरतो आहे. स्त्रीच्या उपजत नेतृत्वक्षमतेला अशा करिअरमधून योग्य वाव मिळू शकतो.’’

या परिषदेस राज्यभरातून; तसेच देशातील अनेक महिला दंतवैद्यकांनी सहभाग नोंदविला. तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे यात आयोजित करण्यात आलेली होती. डॉ. क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भोसले यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read about women's problems with female leadership Pratibha Patil