ग्रीनलॅंडला तापमानवाढीच्या झळा - बजाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

‘जागतिक तापमानवाढीचे प्रत्यक्षात होणारे परिणाम सध्या ग्रीनलॅंडमध्ये दिसत आहेत. आकाराने जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेला हिमखंड ग्रीनलॅंडमध्ये आहे. परंतु, या हिमखंडाचा वितळण्याचा वेग वाढला आहे. या स्थितीसाठी प्रदूषण हे मूळ कारण आहे,’’ असे मत गिर्यारोहक अजित बजाज यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘‘जागतिक तापमानवाढीचे प्रत्यक्षात होणारे परिणाम सध्या ग्रीनलॅंडमध्ये दिसत आहेत. आकाराने जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेला हिमखंड ग्रीनलॅंडमध्ये आहे. परंतु, या हिमखंडाचा वितळण्याचा वेग वाढला आहे. या स्थितीसाठी प्रदूषण हे मूळ कारण आहे,’’ असे मत गिर्यारोहक अजित बजाज यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक सुरेंद्र दुगड, सुधाकर कुलकर्णी व भाग्यश्री दुगड आदी उपस्थित होते.

बजाज म्हणाले, ‘‘लहानपणापासूनच मला साहसी खेळांची आवड होती. गेल्या कित्येक वर्षांपासून मी जगभरातील विविध देशांमध्ये ट्रेकिंग, स्कीइंगसारख्या विविध साहसी खेळांचा अनुभव घेतला आहे. ग्रीनलॅंडमध्ये स्कीइंग करण्यासाठी गेलो तेव्हा त्या भागातील हिमखंडावर होणाऱ्या जागतिक तापमानवाढीचे परिणाम दिसून आले. या बेटाची लोकसंख्या सुमारे ५५ हजार इतकी आहे. परंतु, वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे येथील नागरिकांच्या जीवनावरसुद्धा परिणाम होत आहेत. या सर्व बदलांना रोखण्यासाठी तसेच पृथ्वीच्या संरक्षणासाठी आज प्रत्येक नागरिकाने याची काळजी घेतली पाहिजे, तसेच यासाठी योग्य उपाययोजना राबविल्या पाहिजेत.’’ या वेळी राकेश जैन आणि प्रीती म्हसके यांना पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. राजेश टोळ यांना ‘बेस्ट ब्लॉग ऑफ द इयर’, भार्गवी कांबळेला ‘युवा गिर्यारोहक’ पुरस्कार व ‘नियमित गिर्यारोहण करणारे जोडपे’ हा पुरस्कार डॉ. मारुती व मंदाकिनी धवले यांना अजित बजाज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

निरुपमा भावे, जयंत जोशी यांना ‘जीवनगौरव’
सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनचे सदस्य निरुपमा भावे व जयंत जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. निरुपमा आणि जोशी यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये सायकलद्वारे पुणे ते अमृतसर, पुणे ते जम्मूसारख्या इतर राज्यांचा प्रवास असो किंवा शारीरिक व्यायामासाठी पोहणे, ट्रेकिंगसारख्या विविध साहसी खेळांचा समावेश आहे.

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ट्रेकिंग हा सर्वांत उत्तम पर्याय आहे. गेल्या वीस वर्षांपासून मी सुमारे ५२ ट्रेकिंग सहली आयोजित केल्या असून, यादरम्यान एकदाही मला उपचाराची किंवा औषधांची गरज पडली नाही.
- सुरेंद्र दुगड, संस्थापक, सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The real effects of global warming are currently visible in Greenland