पुण्यात रेड ऍलर्ट 

Red alert in Pune
Red alert in Pune

पुणे - शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 7) संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान खात्याने "रेड ऍलर्ट' दिला असून, पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली.

पुणे शहर आणि त्याच्या जवळील घाटमाथ्यांवर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडला. आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र, आता उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात होईल, असा इशारा हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी "सकाळ'शी बोलताना दिला. 

ते म्हणाले, ""पुण्यात उद्या दिवसभर पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी पडतील. मात्र, रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार असून, मुसळधार पावसाच्या सरी गुरुवारपर्यंत (ता. 8) सुरू राहतील. शहराच्या जवळ असलेल्या माळशेज, ताम्हिणी घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.'' 

का वाढणार पाऊस? 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता सातत्याने वाढत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्रावर होईल. त्यामुळे पुण्यात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

मराठवाड्यात पावसाची शक्‍यता 
मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचवेळी दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवड्यात पावसाच्या हलक्‍या ते मध्मम सरी हजेरी लावतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातही मध्यम ते जोरदार सरी पडतील. 

ही काळजी घ्या 
- आवश्‍यकता असेल तरच घराबाहेर पडा 
- वाहतुकीची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करा 
- पर्यटन स्थळांवर जाणे टाळा 
- महामार्गांवरचा प्रवास टाळा 
- धबधबे, जलाशयात जाण्याचे धाडस टाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com