
सर्वांना विश्वासात घेऊनच बालगंधर्वचा पुनर्विकास; मुरलीधर मोहोळ
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास सर्व घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला गेला आहे. काम सुरू झाल्यानंतर अडीच वर्षात नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल, असा दावा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला. तसेच शहरातील इतर नाट्यगृहांमध्येही सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून आणि देखरेखीखाली हे रंगमंदिर उभे राहिले. ५४ वर्षापूर्वी हे नाट्यगृह उभारले जात असताना तेव्हाही विरोध झाला होता, पण या नाट्यगृहाने शहराच्या वैभवात भर घातली. पण आता बालगंधर्वची नव्याने उभारण्याची करणे गरजेचे असल्याने त्याचा आराखडा तयार केला.
त्यासाठी ज्येष्ठ कलाकार, महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, अधिकारी आणि वास्तुविशारद या सर्वांची समिती नेमून पुनर्विकासाचा आराखडा तयार केला आहे. सध्या केवळ २२ हजार ५०० स्क्वेअर फूटामध्ये उभ्या असणाऱ्या या रंगमंदिराला वाढवून साडेतीन लाख चौरस फुटाचे रंगमंदिर बांधले जाईल. त्यामध्ये पु. ल. देशपांडे आणि ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. बालगंधर्वचा पुनर्विकास करताना तेथे व्यापारी संकुल बांधले जाणार नाही, काही जण हे व्यापारी संकुल असेल, अशा अपप्रचार करत आहेत पण त्यात तथ्य नाही, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने केली जीओ मॉलजी पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना मुंबईतील बीकेसीमधील जोओ मॉलची पाहणी करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे आज (ता. १३) आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे व आर्किटेक्ट सतीश कदम यांनी जिओ मॉलची पाहणी केली. प्रशांत वाघमारे म्हणाले, ‘‘जिओ मॉलची उभारणी अत्यंत अत्याधुनिक व आकर्षक करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या मजल्यावर प्रदर्शनासाठी कलादालन आहेत, दुसऱ्या मजल्यावर छोटे सभागृह आहेत तर तिसऱ्या मजल्यावर दोन सभागृह असून, त्यात मोठे १ लाख चौरस फुटाचे आहे तर दुसरे सभागृह ३० हजार चौरस फुटाचे आहे. बालगंधर्वचा पुनर्विकास करताना तेथील दर्जा प्रमाणे अत्याधुनिक व सुंदर काम करता येणे शक्य आहे.’’
Web Title: Redevelopment Of Balgandharva Rangamandir With The Trust Of All Muralidhar Mohol
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..