‘रेडझोन’ची जमिन खरेदी करू नका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पिंपरी - दिघी, वडमुखवाडी, भोसरी येथील रेडझोन हद्दीतील जमिनीची गुंठेवारी पद्धतीने विक्री केली जात आहे. अनेकांनी प्लॉटिंग करून जमीनविक्रीची ‘दुकाने’ थाटली आहेत. मात्र, ‘रेडझोन भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, फसवणूक होऊ शकते,’ असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केले आहे. 

पिंपरी - दिघी, वडमुखवाडी, भोसरी येथील रेडझोन हद्दीतील जमिनीची गुंठेवारी पद्धतीने विक्री केली जात आहे. अनेकांनी प्लॉटिंग करून जमीनविक्रीची ‘दुकाने’ थाटली आहेत. मात्र, ‘रेडझोन भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, फसवणूक होऊ शकते,’ असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केले आहे. 

रेडझोनमधील जमीन खरेदी-विक्रीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व नागरिकांत जागृती निर्माण करण्यासाठी ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. ११) ‘रेडझोन जमिनींची विक्री’ असे वृत्त प्रकाशित केले आहे. कारण, महापालिकेच्या हद्दीत दिघी, वडमुखवाडी, भोसरी, मोशी परिसरात लष्करी क्षेत्र आहे. जमिनींच्या सात-बारा उताऱ्यावर ‘रेडझोन’चे शिक्के आहेत. तरीही महापालिकेची परवानगी न घेता रेडझोन हद्दीतील जमिनींची सर्रासपणे विक्री केली जात आहे. काहींनी अर्धा ते दोन गुंठ्यांप्रमाणे आखणी करून प्लॉटिंग केले आहे. फलक लावून मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी करून नागरिकांना आकर्षित केले जात आहे. एजंटांच्या माध्यमातून खरेदी-विक्री केली जात आहे. 

पक्की बांधकामे सुरू
दिघी, मोशी, भोसरी, वडमुखवाडी भागातील रेडझोन हद्दीत सर्वाधिक प्लॉटिंग केले आहे. त्यातील बहुतांश जमिनींची विक्री झालेली असून, काही नागरिकांनी बांधकामेही सुरू केली आहेत. या भागाची मंगळवारी पाहणी केली असता दोन ठिकाणी पक्के, तर पाच ते सहा ठिकाणी अँगलच्या आधारे पत्रा लावून बांधकाम सुरू असल्याचे आढळले. काहींनी दुकाने व उपाहारगृहे थाटली आहेत.  

नोंदणी महानिरीक्षकांना पत्र
संरक्षण विभागाच्या हद्दीतील अर्थात रेडझोन हद्दीतील जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी महापालिकेला देता येत नाही. मात्र, परवानगी नसलेली बांधकामे पाडण्याचा अधिकार महापालिकेला आहे. शिवाय, रेडझोन हद्दीतील जमिनी व मिळकतींचे खरेदी-विक्री व्यवहार नोंदवून घेऊ नयेत, असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने नोंदणी महानिरीक्षकांना लेखी स्वरूपात केले आहे. तरीही एजंटांच्या माध्यमातून अशा व्यवहारांची नोंदणी दाखविली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिका क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी जागा खरेदी-विक्री करताना नागरिकांनी महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात शहानिशा करून व्यवहार करावेत. संरक्षण विभागाच्या हद्दीतील भूखंडांची खरेदी-विक्री व्यवहार करून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.’’ 
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता, बांधकाम परवाना विभाग, महापालिका

Web Title: Redzone Land Purchase Municipal Illegal Construction