esakal | Pune District : धार्मिक स्थळे गुरुवारपासून होणार खुली; डॉ. राजेश देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh-Deshmukh

पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे गुरुवारपासून होणार खुली; डॉ. राजेश देशमुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या ‘ब्रेक द चेन’च्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बंद करण्यात आलेली धार्मिक आणि प्रार्थनास्थळे येत्या गुरुवारपासून खुली करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (ता. ५) दिला आहे. या आदेशातून प्रतिबंधित क्षेत्रातील स्थळांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील धार्मिक स्थळे बंदच राहणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे. मात्र धार्मिक स्थळी येणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करणे, दोन व्यक्तींमध्ये नियमानुसार अंतर राखणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा नियमित वापर आणि हात स्वच्छ धुणे अनिवार्य असणार आहे.

धार्मिक आणि प्रार्थना स्थळे खुली झाली तरी, ६५ वर्षे किंवा त्यापुढील वयाचे ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले नागरिक, गर्भवती आणि दहा वर्षे वयाच्या आतील बालकांनी घराबाहेर पडू नये. या सर्वांनी घरीच थांबावे आणि धार्मिक स्थळी जाऊ नये, असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांना दिला आहे. या स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या ठिकाणांना भेट देणारे नागरिक व काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेणे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा: पुणे महापालिकेचे डोळे राज्य शासनाकडे थकीत असलेल्या १००० कोटीकडे

अशी घ्या खबरदारी -

- प्रत्येक नागरिक, भेट देणाऱ्या व्यक्तींना मास्कशिवाय प्रवेश देऊ नये

- साबणाने वारंवार हात धुवावेत

- हात निर्जंतुक करण्यासाठी अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचा वापर करावा

- श्वसनाबाबत शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करण्यात यावे

- खोंकताना व शिंकताना तोंड व नाक झाकावे

- शिंकताना टिश्यू पेपर, हातरुमाल किंवा हाताच्या कोपऱ्याचा वापर करावा

- टिश्यू पेपरची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी

- आजारी असलेल्या व्यक्तीची माहिती राज्य किंवा जिल्हा हेल्पलाइन क्रमांकावर द्यावी

- प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी थुंकण्यास बंदी घालावी

- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी

- आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यात यावा.

- प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था करावी

- प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनींग करावे

- लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश द्यावा

- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना दर्शविणारे फलक लावावेत

- प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत श्राव्य किंवा चित्रफितीद्वारे जनजागृती करावी

- भक्तांना टप्प्याटप्प्याने प्रवेश द्यावा

- पादत्राणे हे स्वतःच्या वाहनांमध्ये ठेवण्याची सक्ती करावी

- वाहनतळाच्या ठिकाणी व आवारात गर्दी नियंत्रित करण्याचे व्यवस्थापन करावे

- बाहेरील आवारात असलेली दुकाने, स्टॉल्स, उपाहारगृहांच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन व्हावे

हेही वाचा: उंड्री : परीक्षा केंद्रावर खाकी वर्दीला फुटला पाझर

खालील बाबींची बंदी कायम

- मुर्ती, पुतळ्यांना स्पर्श करण्यास बंदी

- मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे मेळावे घेण्यास टाळावे

- वादक किंवा गायन गटास प्रतिबंध

- शारीरिक संपर्क टाळण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे बंद

- सामुदायिक प्रार्थनेसाठी एकाच चटईचा उपयोग टाळणे अनिवार्य

- कोणत्याही वस्तू अर्पण करणे, प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी शिंपडणे बंद

loading image
go to top