पुण्यात रेमडेसिव्हिरचा काळा बाजार 

योगिराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 22 September 2020

कोरोनाबाधितांवर उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळा बाजार पुण्यात सुरू झाला आहे. 5400 रुपयांना मिळणारे हे इंजेक्‍शन आता दोन-अडीच हजार रुपये जास्त भरून विकत घेण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे. 

पुणे - कोरोनाबाधितांवर उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळा बाजार पुण्यात सुरू झाला आहे. पाच हजार चारशे रुपयांना मिळणारे हे इंजेक्‍शन आता दोन-अडीच हजार रुपये जास्त भरून विकत घेण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे. 

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित काही रुग्णांवर प्रभावी ठरणाऱ्या या इंजेक्‍शनच्या वापराबद्दल निश्‍चित नियमावली करण्याची वेळ आली असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. कोरोनाबाधित रुग्णांना दाखल केल्यानंतर डॉक्‍टर त्याला पहिले प्रिस्क्रिप्शन रेमडेसिव्हिरचे देतात. रुग्णाला हे इंजेक्‍शन नक्की उपयुक्त ठरणार आहे की नाही?, याचा नेमका विचार त्यामागे असतो का, अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. इंजेक्‍शनची गरज असलेला आणि गरज नसताना लिहून दिलेला, अशा दोन्ही रुग्णांचे नातेवाईक इंजेक्‍शनसाठी वणवण फिरतात. त्यातून किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन इंजेक्‍शनची खरेदी होत असल्याचे चित्र दिसत असल्याचे औषधनिर्माण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीकचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ""रुग्णाच्या नातेवाइकांनी "एमआरपी'च्या दरातच इंजेक्‍शन खरेदी करावे. यासंदर्भात केमिस्ट असोसिएशनची हेल्पलाइन आहे. त्यासाठी शुक्रवार पेठेतील असोसिएशनच्या कार्यालयात संपर्क साधावा.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील म्हणाले, ""रेमडेसिव्हिरच्या सोमवारी आलेल्या आठ हजार आणि रविवारी दाखल झालेल्या चार हजार वायलचे वितरण झाले आहे. प्रत्येक रुग्णाला डॉक्‍टर हे इंजेक्‍शन लिहून देत आहेत.'' 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"कुंदन फॉर्माकॉन'चे अभय दर्डा म्हणाले, ""रोज इंजेक्‍शन्स येतात आणि संध्याकाळपर्यंत संपतात. पूर्वी फक्त शहरांमधील डॉक्‍टर हे इंजेक्‍शन लिहून देत होते. आता राज्याच्या ग्रामीण भागातूनही लिहून दिले जात आहे. त्यामुळे मागणी चार पटींनी वाढली आहे.'' 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनावर एकही प्रभावी औषध आले नाही. त्यामुळे रेमडेसिव्हिर हे इंजेक्‍शन प्रत्येक रुग्णावर उपयुक्त ठरेलच असे नाही. याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे गैरवापर टाळण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या वापराबद्दल खासगी रुग्णालयांसोबत बैठक झाली आहे. 
- डॉ. सुभाष साळुंखे,  वैद्यकीय सल्लागार, कोरोना संसर्ग विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remdesivir injection black market in Pune