भावांनो, थोडं थांबा! आत्महत्या कसली करताय; टेन्शन आल्यास 'हे' उपाय करा 

po.jpg
po.jpg

पुणे : ''हा निर्णय आमचा आम्हीच घेत आहोत, पोलिसांनी याला कोणालाही जबाबदार धरू नका.'' असे भिंतीवर लिहून त्या नवरा बायकोने खाली सह्या केल्या आणि एकाच गळफासाला लटकून दोन चिमुकल्यांसह चौघांनी आपला जीवन प्रवास कायमचा थांबवला. दुसरीकडे 45 वर्षीय मंडप व्यावसायिकाने कोणालाही कळू न देता रात्री स्वयंपाक घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरीत तीन तरुण अभियंत्यांनी नैराश्‍यातून जगण्याला रामराम ठोकला... या घटना विलक्षण त्रासदायक आहेत. सहजासहजी कोणीही जीव देणार नाही पण. हो पण... क्षणभर थांबून जरा विचार करा, या परिस्थितीतूनही मार्ग निघू शकतो. भावांनो, आत्महत्या कसली करताय, या मनस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत. 

लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या परिस्थितीने संपूर्ण जगालाच हादरवले आहे. एका बाजूला कोरोनाची भीती आणि दुसरीकडे घरी बसून संसार कसा चालवायचा, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, मुलांची फी कशी भरायची. नोकरी गेल्याने आता दुसरी नोकरी कधी आणि कशी मिळणार अशा अनेक चिंतांनी ग्रासले आहे. या आणि अशाप्रकारच्या ताण-तणावातून गेल्या महिना दीड महिन्यांपासून हे जीवनच नको असे म्हणणारे वाढू पाहत आहेत. अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येनंतर बातम्या, सोशल मीडिया या सर्व ठिकाणी आत्महत्या हाच विषय कानावर पडत आहे. त्यातून मानसिक अवस्था बिघडलेल्यांना आणखीन त्रास होताना दिसतोय. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकालाच अडचणी आहेत. कोणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत, कोणाचा धंदा पूर्णपणे बसला आहे, कोणाचे पगार कमी केले आहेत, अशा एक ना अनेक अडचणी आहेत. पण या परिस्थितीतही आपले मानसिक संतुलन ढळू न देता प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे, हे लक्षात घेऊन परिस्थितीचा "दट के सामना' करायलाच हवा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काय कराल 
गेल्या दोन महिन्यांपासून होत असणाऱ्या आत्महत्यांमागे आर्थिक अस्थिरता हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. आर्थिक अडचण कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच आहे. अशा वेळी हाती असणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करायला हवे. स्वत:चा प्राधान्यक्रम ठरवून महिनाभराचे बजेट आखून तसा खर्च करायला हवा. जर इतरांकडून उसने पैसे घेतले असतील, तर त्या व्यक्तीला विशिष्ट महिन्यांची मुदत देऊन तगादा न लावण्याची विनंती करायला हवी. बॅंकांचे हप्ते भरण्याची मुदत ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे थेट हप्ते बंद करू शकता. सावकाराचे कर्ज असेल तर त्यालाही पुढच्या महिन्यांची मुदत द्यायला हवी. जर तो ऐकत नसेल तर सरळ पोलिसांची मदत घ्या. परवाना नसताना सावकारी करणे हा गुन्हा आहे, तसेच पैशांसाठी मानसिक शारीरिक त्रास देण्याचा कोणालाही अधिकार नाही. अशा प्रकरणांमध्ये तुमचे जवळचे मित्र प्रतिष्ठित व्यक्ती यांना मध्यस्थी घाला. पण त्यासाठी जिवाचे बरे वाईट करू नका.आपल्यावर कर्ज असणे हा गुन्हा नाही. 

नोकरी गेलीय काय करणार? 
लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. काहींनी नोकर कपात केली आहे. जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले असेल तर घाबरू नका. तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. राज्यसरकारच्या उद्योग आणि कौशल्य विकास विभागाने नोकरी देण्यासाठी विविध पर्याय तयार केले आहेत. अनेक कंपन्यांमधून कुशल -अकुशल कामगार सोडून गेले आहेत. कोणत्या उद्योगांसाठी मनुष्यबळाची गरज आहे याची यादी तयार करण्यात येत आहे. तुम्ही www.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जा त्याठिकाणी बेरोजगारांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. 

काही दिवस जे मिळेल ते काम स्वीकारा. परप्रांतीय आपल्या गावी गेल्याने अनेक कामे उपलब्ध आहेत, त्यातील योग्य कामाची निवड करा. तुमच्यात वेगळे कौशल्य असेल तर तुमचा व्यवसायही करू शकता. त्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंक कर्ज देण्यासाठी तयार आहेत. तो पर्यायही तुमच्यासमोर आहे. हे करताना तुमच्या कुटुंबीयांशी बोला. त्यांना सगळी आर्थिक परिस्थिती सांगा. कोणापासूनही काही लपवू नका. 
थोडी नवीन कौशल्य (स्कील) घेता येतात का याचा अंदाज घ्या. शॉर्ट टर्म कोर्स करूनही तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. 

तणावात आहात मग हे करा 
आत्महत्येचा विचार वारंवार येत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला, न लाजता डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. सरकारी रूग्णालयांमध्ये तसेच हेल्पलाईनद्वारे मानसोपचारतज्ज्ञांचा तुम्हाला मोफत सल्ला मिळू शकतो. याशिवाय पुढील गोष्टी आवर्जून करा. ज्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. 
- दीर्घ श्वास घ्या. तुम्ही आपल्या श्वासवर लक्ष केंद्रित करा. तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यास दीर्घ श्वास मदत करतो. शरीरात ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मनाला शांतता वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. नेहमी दीर्घ श्वास आत घेण्याची अंगी लावून घ्या. त्यामुळे याचा तणाव कमी होण्यास मदत होते. 

- मित्रांना फोन करा. मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो. 
- स्वतः:साठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करा. कोणताही विचार न करता 5 ते 10 मिनिटे डोळे बंद करून बसा. 
- वाचन, लेखन किंवा छंदासाठी थोडा वेळ काढा. टीव्ही बघून किंवा संगीत ऐकून स्वतःची करमणूक करा. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळते. लक्ष त्याकडे केंद्रित होते. त्यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते. 
- धावा किंवा जोरात चाला. तुम्हाला शारीरिक व्यायामाची गरज आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीरावरील ताण कमी होतो. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला ताजा ऑक्‍सिजन मिळतो. तुमचा मूड चांगला राहतो. त्यामुळे व्यायामावर भर द्या.

-या हेल्पलाईन वर साधा संपर्क (8390028383) सकाळी 11 ते 4 

परिस्थिती सुधारतेय 
कोरोनानंतरच्या परिस्थितीत आता बदल होत आहे. येत्या दोन -तीन महिन्यांत ही परिस्थिती बदलेल. त्यामुळे त्याचा ताण मनावर घेऊन कोणतेही पाऊल टाकू नका. उद्योगधंदे, व्यवसाय सुरु होत आहेत. नोकऱ्या मिळू लागल्या आहेत. फक्त धीराने सामोरे जा. आपल्या मनात येणारे विचार इतरांशी बोला. रात्रीनंतर दिवस आहे हे आपण दररोज पाहतो, त्यामुळे मुळीच निराश न होता. कामाला लागा. 

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निकेत कासार म्हणतात...महामारीच्या काळात इतर आरोग्याएवढीच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक असते. सध्याच्या परिस्थितीत नैराश्‍य येणे सहाजिक आहे. पण आपण परिस्थिती स्वीकारायला हवी. परिस्थिती सर्वांसाठी सारखीच आहे, हे समजून मार्ग काढायला हवा. या काळात एकमेकांची मदत घ्या. कुटुंब, नातेवाईक, मित्र यांच्याशी बोलत रहा. घाबरून, लाजून किंवा आता मला कोणीच काही मदत करणार नाही असे समजू नका. समाजात अधिकाधिक मिसळला तर आपला ताण हलका होऊ शकतो. टोकाचा कोणताही निर्णय घेऊ नका. काही महिन्यांमध्ये परिस्थिती नॉर्मल होणार आहे. मनात आलेले विचार व्यक्त करा, हेल्पलाइनद्वारे डॉक्‍टरांशीही बोलू शकता.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com