कामगार लसीकरणासाठी वयाची अट रद्द करा; खा. अमोल कोल्हेंची केंद्राकडे मागणी

amol kolhe
amol kolhe

पुणे : केंद्र सरकारने औद्योगिक क्षेत्रातील ४५ वर्षे वयोगटांवरील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४५ वर्षे वयोगटाची अट रद्द करून सरसकट सर्व कामगारांना लस द्यावी तसेच राज्याला पुरेशा प्रमाणात लसींचा व ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्राकडे केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना त्यांनी याबाबत पत्र पाठवले आहे. या संदर्भात खा. कोल्हे म्हणाले, देशात सर्वाधिक औद्योगिक क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात तर कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये बंद असलेले उद्योगधंदे जवळपास सर्वच पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. स्थानिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लाखो कर्मचारी काम करत आहेत. दररोजचा प्रवास आणि संपर्कातून एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यास त्या कंपनीतील इतर कर्मचारी आणि त्या परिसरातील अन्य कंपन्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. याशिवाय या कर्मचाऱ्यांद्वारे त्यांच्या कुटुंबापर्यंत कोरोनाचे लोण पोहोचू शकते. साधारणत: १८ वर्षे वयोगटांवरील कर्मचारी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्ग आणि त्या संबंधित सर्वांनाच वयाची अट न ठेवता सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत आपण स्वत: लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. ठिकठिकाणी काम करणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांना मागणीनुसार लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत सर्वाधिक लसीकरण करण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे केंद्र सरकारकडून कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लशींचा मागणीनुसार निरंतर पुरवठा केला पाहीजे. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला विचारात घेत अखंडित ऑक्सिजन पुरवठा देखील केला पाहीजे. तसेच रेमेडिसिवीर इंजेक्शनचा सध्या जाणवणारा तुटवडा लक्षात घेऊन पुरेशा प्रमाणात रेमेडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासोबतच आरोग्य विभागात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले पाहीजे आदी बाबींकडे लक्ष वेधून केंद्र सरकारने तातडीने निरंतर कोरोना प्रतिबंधक लस, रेमेडिसिवीर इंजेक्शनसह अखंडित ऑक्सिजन पुरवठा करावा अशी विनंती लेखी पत्राद्वारे खा. डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com