mistree1.JPG
mistree1.JPG

प्रशासनासह लोकप्रतिनिधींची  बाधित कुटुंबांकडे पाठ 


पुणे ः मुळा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक भागांना त्याचा फटका बसला. वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील अनेक कुटुंबे बाधित झाली होती, मात्र पूर ओसरल्यानंतर प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी "सकाळ'कडे व्यक्त केली आहे. या परिसरात अनेक साथीचे आजार पसरले असून, आरोग्य विभागाने या ठिकाणी स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली नसल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे. 

काही भागात पुराने वाहून आलेला गाळ व कचरा तसाच पडून आहे. या राडारोड्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या नाहीत, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवर त्यांचा राग असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. 

स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया 

अधिकाबाई दुबळे ः पूरपरिस्थितीत प्रशासनाने व स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी काळजी घेतली, मात्र पूर ओसरल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडले. आम्ही घरी परतल्यावर घरात गुडघाभर चिखल होता. घरातील सामान वाहून गेले होते. धान्य, कपडे, अंथरूण सगळे सामान भिजून गेले होते. अशा वेळेस मदतीची जास्त गरज होती. 

नम्रता क्षीरसागर ः पुराचे पाणी आले तेव्हा जीव मुठीत घेऊन हाताशी मुलांना घेऊन पळत सुटलो. त्यामुळे घरातील वस्तू सुरक्षितस्थळी हलवायला वेळच नाही मिळाला. पुराचे पाणी दहा फूट चढेल, असे वाटले नाही. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. मात्र जसजसे पाणी वाढू लागले, तसे आम्ही सगळे रस्त्याच्या दिशेने धावत सुटलो. सहा दिवस शाळेत राहिलो, मात्र आता घरी परतल्यावर कष्टाने उभा केलेला संसार मोडलेला बघायला मिळाला. 
 

विद्या लोखंडे ः पूर ओसरल्यावर आरोग्य विभागाने काही ठिकाणी औषध फवारणी केली, तर काही ठिकाणी केली नसल्याने आमच्या भागातील सगळ्यांना साथीच्या आजाराने ग्रासले आहे. या भागात आरोग्य तपासणी झाली पाहिजे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. 

शारदा बनसोडे ः या ठिकाणी आम्ही जीव धोक्‍यात घेऊन राहतो. दरवर्षी पुराचा फटका आम्हाला बसतो. निवडणुका येतात तसे आमच्यावर आश्‍वासनांचा पाऊस पड़तो, मात्र पावसात आमचे खूप हाल होतात. यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना केली पाहिजे. हातावर पोट असणारी आम्ही माणसे, प्रशासनाने व स्थानिक प्रतिनिधींनी आमच्या भागाकडे लक्ष दिले पाहिजे. 

शालू उजगारे ः निवडणुका असल्या की पाटील इस्टेटमधील माणसे दिसतात. मात्र आपत्ती काळात आम्हाला या लोकांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. मत मागतात त्याप्रमाणे कामेही केली पाहिजेत. 



""पूर आल्यापासून ते ओसरल्यानंतर सदर भागात प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. पाटील इस्टेटमध्ये लोकांना घरी सोडण्यापूर्वी त्या भागात आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर कीटकनाशक औषध व पावडर फवारणी केली, तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून वेगळी औषधे वापरण्यात आली. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे नागरिकांचे देखील कर्तव्य आहे.'' -किशोरी शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका 

""बाधितांच्या स्थलांतरापासून ते पुन्हा त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यापर्यंत, तसेच त्यांच्या जेवण, नाश्‍त्याचा सोयीपासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे सगळे काम महापालिकेच्या मदतीने योग्यरीतीने केलेले आहे. या व्यतिरिक्त आमच्या कामाचा आढावा घ्यायचा असेल, तर माझ्या फेसबुक अकाउंटवर सर्च करा, आम्ही केलेले काम दिसेल.'' - आदित्य माळवे, नगरसेवक, शिवाजीनगर 
---------------------- 

""या आपत्कालीन परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही महापालिकेच्या माध्यमातून काम केले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय, औषध व्यवस्था आदी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या होत्या. आम्ही आमचे काम योग्य पद्धतीने केले आहे.'' -रेश्‍मा भोसले, नगरसेविका, शिवाजीनगर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com