esakal | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलासाठी पुन्हा प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

Bridge

या कारणांमुळे उड्डाण पुलांची आवश्‍यकता

  • तळेगाव, वडगाव मावळ, चाकण येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक. 
  • नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी 
  • लोणावळा, तळेगाव, कामशेत या ठिकाणी जाण्यासाठी अधिक वापर. 
  • या महामार्गावरून पुढे द्रुतगती महामार्गावरही जाता येते.  
  • पावसाळ्यात पर्यायी मार्ग.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलासाठी पुन्हा प्रस्ताव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडे पाठविला आहे. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गतिमान कारभारी म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी आता तरी या प्रस्तावाला मान्यता देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. त्यामुळे दरडी काढण्याच्या कामादरम्यान किंवा मोठा अपघात होऊन वाहतूक कोंडी झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक जुना पुणे - मुंबई महामार्गावर वळवली जाते. तसेच सलग येणाऱ्या सुट्‌टयांमुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच - लांब रांगा लागतात. त्याचबरोबर जुन्या पुणे -मुंबई महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर नागरीकरण तसेस उद्योग व्यवसाय वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरही वाहनांची संख्या वाढली आहे.

नागरीकरणामुळे महामार्गावरील चौकात यू टर्न घेण्यासाठी तसेच पलीकडे वळण्यासाठी मुख्य रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे एखाद्या वाहनाने वळण घेण्यासाठी गाडी थांबली तरी पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला. यामुळे देहूरोड ते लोणावळ्यापर्यंत नऊ ठिकाणी उड्डाण पूल होणार असल्याने सरळ वेगाने वाहने पुढे जाणार आहेत. त्यामुळे या प्रमुख नऊ चौकात होणारी वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार असून, ज्या प्रवाशांना रस्ताच्या पलीकडे जायचे किंवा वळण घ्यावयाचे आहे, अशा प्रवाशांना उड्डाण पुलाखाली जाता येणार 
आहे. 

या ठिकाणी प्रस्तावित उड्डाण पूल
सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव चाकण रस्ता, एमआयडीसी वडगाव , देहूरोड वाय जंक्‍शन, वडगाव फाटा, कामशेत, कार्ला फाटा, कान्हे फाटा. त्यासाठी सुमारे ३६० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती ‘एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

loading image