
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील स्वातंत्र्यसैनिक साहेबराव कोंडीबा दळवी वय 102 यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी जागवल्या.
Republic Day : अन् इंग्रजांना खादीचे कपडे, गांधी टोपी घालण्यास भाग पाडले
डोर्लेवाडी - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील स्वातंत्र्यसैनिक साहेबराव कोंडीबा दळवी वय 102 यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी जागवल्या.
सकाळशी बोलताना दळवी म्हणाले, इंग्रज अधिकारी भारतीयांना सातत्याने त्रास देत असल्याने त्यांच्या राजवटीला सर्वसामान्य जनता वैतागली होती. इंग्रजांबद्दलचा संताप व देशप्रेम मनात घेऊन बारामती तालुक्यातील आम्ही काही तरुण देश कार्याला मदत करण्यासाठी एकत्र झालो. १९४२ च्या लढ्यानंतर बारामतीमधून आम्ही मोठा मोर्चा काढला होता. इंग्रजांना धडा शिकवण्याचा निर्णय आम्ही घेतला.त्यातूनच बारामती येथील पोस्ट लुटले व रेल्वे स्थानकावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या अंगावरील कपडे फाडले अन् त्यांना खादीचे कपडे आणि गांधी टोपी भाग पाडले. इतकेच नव्हे, तर 'वंदे मारतम्' ही म्हणण्यास भाग पाडले.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक साहेबराव कोंडिबा दळवी यांनी स्वातंत्र्य लढ्यातील या आठवणी जागविल्या. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९२० मध्ये झाला आहे.त्यानुसार आज त्यांचे वय १०२ वर्षे आहे. त्यांनी सांगितलेल्या घटनेला आता ८० वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी स्वातंत्र्य लढ्याच्या त्या सर्व घटना आजही जशाच्या तशा त्यांच्या स्मरणात आहेत.
मला लहानपणापासूनच देशभक्तीची आवड होती.त्यामुळे प्रपंच करीत असताना हळूहळू सेवा दलात कार्य करीत राहिलो. १९४२ च्या काळात संपूर्ण देशात ब्रिटीशांना विरोध वाढू लागला होता. ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलन सुरु होण्यापूर्वी देशभक्त केशवराव जेधे यांनी डोर्लेवाडी येथे येऊन सभा घेतली त्यामध्ये मी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
बारामतीतील घटनेबाबत त्यांनी सांगितले, १३ ऑगस्ट १९४२ रोजी बारामतीत काढलेल्या मोर्चामध्ये वर्धमान भाई कोठारी,विलासभाई कोठारी,भाई गुलामअली शेख आदींसह अनेक कार्यकर्ते होते.इंग्रजांना धडा शिकवायचा चंग आम्ही बांधला होता. त्यासाठी बारामतीमधील त्या वेळच्या सागर खादी भांडारमधून खादीचे कपडे आणि गांधी टोपी खरेदी केली होती. इंग्रज अधिकाऱ्यांचे कपडे फाडून व मोठा दबाव निर्माण करून आम्ही त्यांना खादीचे कपडे व गांधी टोपी घालण्यास भाग पाडले. मात्र, या घटनेमुळे इंग्रज अधिकारी चांगलेच संतापले होते. बारामतीच्या चौकात अधिकाऱ्यांनी आम्हाला अडविले व काठीने मारही दिला. त्यानंतर आमच्यावर खटलेही भरण्यात आले. ३ महिने येरवड्याच्या तुरुंगातही ठेवण्यात आले. त्यामध्ये आम्हाला फटक्यांची सजा देण्यात आली.वय लहान असल्यामुळे त्यानंतर आम्हाला सोडण्यात आले. मात्र सोडल्यानंतर पोलिसांची आमच्यावर अनेक दिवस पाळत होती.
आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या इर्षेने झपाटलो होतो. माझ्या बरोबर गुणवडी येथील काही तर गावातील श्रीपती नाळे, खंडेराव नवले, सखाराम नाळे, नामदेव चौधरी, भगवान मोरे आदी सवंगडी होते. आमचा लढा सुरूच राहिला. त्यानंतर काही वर्षातच इंग्रज भारतातून गेले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. आम्ही पहिला स्वतंत्र दिन हा गावच्या मुख्य ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येत साजरा केला. ध्वजारोहण करण्यात आले. देश भक्तीपर गाणी म्हणण्यात आली. प्रत्येकांनी आपल्या आपल्या घरी गोड धोड जेवण केले होते. म्हणजे सर्वानी दिवाळीच साजरी केली होती मला तो क्षण आज ही आठवतो.
स्वातंत्र्यसैनिक स्मृतीस्तंभ बांधल्याने समाधान
देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या आठवणी नुकताच शासनाने राबविलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमामुळे पुन्हा जाग्या झाल्या आहेत. आजची तरुण पिढी विविध कारणांनी भरकटलेली दिसत आहे. देशाविषयी आत्मीयता, प्रेम ठेवून सर्व तरुणांनी एकीने वागले तरच देशाची प्रगती होईल. गावात ५ स्वातंत्र्यसिनिक आहेत त्यांच्या आठवणी जाग्या राहाव्यात यासाठी ग्रामस्थांनी स्मृतीस्तंभ बांधल्यामुळे समाधान वाटत आहे.
- साहेबराव कोंडीबा दळवी, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक