
Republic Day 2023 : स्वातंत्र्य चळवळीचा काळ पाहिलेल्या आजी!
आता नव्वद वर्षे वय असलेल्या उषा नगरकर या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या नव्हत्या तरी तो काळ त्यांनी जवळून पाहिला आहे. वडिलांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना सोसलेल्या अडचणी व त्यांवर केलेली मात यांना आयुष्यभर ऊर्जा देणारी ठरली. यामुळे माणुसकी जपणे, शिक्षणाचा प्रसार तळागाळातील मुलांपर्यंत करणे यात उषाताईंचा नेहमीच पुढाकार राहिला.
उषाताई म्हणाल्या, ‘‘माझे वडील रामचंद्र पांडुरंग नातू हे आजपासून शंभर वर्षांपूर्वी एमबीबीएस झालेले होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल परम आदराची भावना असायची. त्यांच्याबद्दल ते भरल्यासारखे बोलत राहात. लोकमान्य टिळक यांचे थोरले चिरंजीव वर्गमित्र असल्याने त्यांच्याकडे वडील बरेचदा जात.
लोकमान्यांच्या स्फूर्तिदायक हकिगती ते घरी आल्यावर सांगत. एकदा लोकमान्यांकडे ते गेले असताना कुठले तरी कोडेवजा लाकडी यंत्र तेथे बरेचजण उघडून पहात होते. कुणालाच ते जमेना. वडिलांनी लोकमान्यांना विचारून ते घरी आणले. मध्यरात्र उलटून गेल्यावर त्यात त्यांना यश मिळाले. सकाळी घाईघाईने ते लोकमान्यांकडे, यंत्र उघडण्याची विशिष्ट मेख सांगायला गेले. लोकमान्यांनी त्यांची पाठ थोपटत सांगितले की, तुझ्यासारख्या हुशार तरुणाच्या बुद्धीचा उपयोग राष्ट्रासाठी झाला पाहिजे.
ही गोष्ट वडील आवर्जून सांगत तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी येई. डॉक्टर झाल्यावर ते हैदराबाद संस्थानच्या नोकरीत होते. मात्र तेथील निजाम राजवटीतील अत्याचारांनी व्यथित होत असत. पुढे हैदराबाद मुक्ती संग्राम ऐन भरात असताना वडील त्या नोकरीतून पळ काढून निसटले. तळागाळातील युवकांच्या प्रगतीसाठी व त्यांच्यात देशभक्तीची भावना पेरण्यासाठी वडिलांनी काम केले. वडिलांच्या प्रभावामुळे माझा ओढा समाजकार्याकडे राहिला.’’
उषाताईंनी असेही सांगितले की, लग्न झाले तेव्हा मी अठरा वर्षांची होते. त्यानंतर दहा वर्षांनी मी संस्कृत विषयात एम.ए. केले. शिक्षिका म्हणून चौतीस वर्षे काम करताना तळागाळातील मुलांना शिक्षणाची गोडी लावताना धन्यता वाटायची. आपटे प्रशालेच्या अगदीच सुरवातीच्या दिवसांमध्ये चार वर्षे मी संस्थेसाठी विनामूल्य सेवा देत होते.
डेक्कन परिसरातील वस्त्यांमध्ये आम्ही कार्यकर्ते जायचो. कामगार, हातगाडीवाले, मोलकरीण, रिक्षाचालक आदींच्या मुलांना आम्ही शालेय शिक्षणाची गोडी लावायचा प्रयत्न केला. नंतर रेणुका स्वरूप शाळेत नोकरी लागल्यावर तेथे तीस वर्षे संस्कृत व मराठी शिकवले. निवृत्तीनंतरही बरीच वर्षे अनेक मुलांना आमच्या घरी संस्कृतचे मोफत शिक्षण देत राहिले. माझ्या लहानपणी मी वडिलांकडे येणाऱ्यांच्या तोंडून देशभक्तीसंबंधी सतत अनेक गोष्टी ऐकायचे. त्यांतील कित्येक आजही आठवतात.’’
भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचा तो पहिलावहिला प्रसंग होता. त्यात राष्ट्रगीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांना पाचारण करण्यात आले होते. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर, भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या शेजारी उभे राहून हिराबाईंनी राष्ट्रगीत सादर केले. आम्ही ते नभोवाणीवरून ऐकतानाचा थरार आजही ताजा आहे.
- उषा नगरकर