प्रजासत्ताक दिन विशेष : संविधानातील मूल्यांचा जागर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

विद्यालयाची वैशिष्ट्ये

  • १८ जातींतील १२५ विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण
  • शनिवार आणि रविवारी रोज तीन तास प्रशिक्षण
  • खेळांसह कौशल्य विकासासाठी प्रयत्न
  • स्पोकन इंग्लिश, काॅम्प्युटर क्‍लास, तज्ज्ञांच्या मुलाखती, क्षेत्रभट आदींचा समावेश

पुणे - संविधानातील बंधुता, न्याय, समानता ही मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत रुजावीत, या हेतूने शहरातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ‘अठरापगड’ नावाने विद्यालय रविवारी पुण्यात सुरू होत आहे. या विद्यालयात उपेक्षित समाज घटकातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय ‘संविधानाचा प्रचार’ हादेखील उपक्रम राबविण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

समाजातील दुर्लक्षित अठरापगड समाजातील मुलांसाठी ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या वतीने ‘अठरापगड विद्यालयाची’ स्थापना करण्यात आली आहे. रविवारी (ता. २६) संध्याकाळी चार वाजता सोमवार पेठेतील आगरकर मुलींच्या शाळेत याचे उद्‌घाटन होणार आहे. वर्धिनीचे कार्याध्यक्ष रामभाऊ डिंबळे यांची ही संकल्पना असून, प्रकल्प प्रमुख म्हणून रोहित धायरकर काम पाहत आहे.

वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. एकरस भारताच्या निर्मितीसाठी शिक्षण आणि करिअरबरोबरच शारीरिक, मानसिक, बौद्धिक जडणघडण होऊन विद्यार्थ्यांमधून विधायक नेतृत्व निर्माण व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.
- ज्ञानेश पुरंदरे, कार्यवाह, स्व-रूपवर्धिनी

व्यापक प्रचारासाठी प्रचारक कार्यशाळा
संविधानातील मूल्यांचा अर्थ समजून रोजच्या जीवनात त्याचा अवलंब व्हावा म्हणून संविधान प्रचारक कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली आहे. गावोगावी संविधानाच्या प्रचारकांची फळी निर्माण व्हावी, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक संदीप आखाडे यांनी दिली. एस. एम. जोशी फाउंडेशन, राष्ट्र सेवा दल आदी संघटनांच्या सहकार्याने राज्यभर ही कार्यशाळा राबविण्यात येत आहे. कार्यशाळेत निर्माण झालेले प्रचारक गावोगावी वाड्या-वस्त्या, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी संविधानातील मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करत असल्याची माहिती आखाडे यांनी दिली.

दृष्टिक्षेपात...
 राज्यात १२ ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन
 कार्यशाळेतून ७५० युवकांना प्रशिक्षण
 ७० प्रशिक्षकांची निर्मिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day Special