कर्करोगाचा धोका ओळखता येणार; पुण्यातील तज्ज्ञांचे संशोधन

योगीराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Monday, 12 October 2020

रक्तातील ट्यूमर असोसिएटेड पेशींची (सी-टॅक. C-ETACs) वाढती संख्या नजीकच्या भविष्यात होणाऱ्या कर्करोगाच्या धोक्‍याची घंटा असते, असा निष्कर्ष पुण्यातील कर्करोग तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून निघाला आहे.

पुणे - रक्तातील ट्यूमर असोसिएटेड पेशींची (सी-टॅक. C-ETACs) वाढती संख्या नजीकच्या भविष्यात होणाऱ्या कर्करोगाच्या धोक्‍याची घंटा असते, असा निष्कर्ष पुण्यातील कर्करोग तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून निघाला आहे. पुणे आणि नाशिकसह वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या संशोधनाचा शोधनिबंध अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 

मानवी अवयवाचा तुकडा (बायोप्सी) घ्यायचा. त्याची प्रयोगशाळेत तपासणी करायची. त्यात कर्करोगाच्या पेशी दिसतात का, या आधारावर कर्करोगाचे निश्‍चित निदान करण्याची पद्धत जगभर वापरली जाते. पण, तोपर्यंत रुग्णाचा कर्करोग वाढलेला असतो. उपचारांतील गुंतागुंत निर्माण झालेली असते. या पार्श्‍वभूमीवर कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष निघाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असे केले संशोधन? 
- पुणे आणि नाशिकमधील 30 हजार रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यापैकी नऊ हजार 416 रुग्णांना कर्करोग झाल्याचे निश्‍चित निदान झाले. तसेच, सहा हजार 725 रुग्णांना कर्करोगाची स्पष्ट लक्षणे होती. तर, 13 हजार 919 जणांना कर्करोगाची कोणतीही लक्षणे नव्हती. 
- या सर्वांचे रक्ताचे नमुने संकलित केले. 
- रक्तातून वाहणाऱ्या ट्यूमर असोसिएटेड पेशींचे इम्युनोसाटो केमिस्ट्रीच्या (आयसीसी) आधारे वर्गीकरण केले. 
- कर्करोग व त्याच्या प्रकारानुसार पुन्हा वर्गीकरण केले. त्याचा तुलनात्मक अभ्यास बायोप्सीबरोबर केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निष्कर्ष - 
- रक्तातील ट्यूमर असोसिएटेड पेशी असलेल्या 91.8 टक्के रुग्णांना यापूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. 
- लक्षणे असलेल्या 6 हजार 725 पैकी 6 हजार 25 रुग्णांना कर्करोगाचे निदान झाले. 700 रुग्णांमध्ये कर्करोगाची नुकतीच सुरवात झाली होती. 
- त्यामुळे 92.6 टक्के रुग्णांमध्ये कर्करोगाचे अचूक निदान झाले. 
- रक्तातील ट्यूमर असोसिएटेड पेशी या सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये सर्वव्यापी असतात. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रक्तातील ट्यूमर असोसिएटेड पेशी शरीरात असतील तर कर्करोगाचा धोका वाढतो. त्यासाठी पुणे आणि नाशिक येथील रुग्णांमध्ये एक वर्ष पाठपुरावा केला होता. अमेरिकन असोसिएशन ऑफ क्‍लिनिकल रिसर्च या जगविख्यात नियतकालिकाने हा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. 
- डॉ. अमित भट्ट, कर्करोग तज्ज्ञ 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रक्तातील ट्यूमर असोसिएटेड पेशी वाढल्या की कर्करोगाची शक्‍यता वाढली, हे या संशोधनातून स्पष्ट झाले. यातून कर्करोगाचे लवकर निदान होऊन रुग्णांवर तातडीने प्रभावी उपचार करता येतात. त्यामुळे कर्करोगमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढेल, असा विश्‍वास आता निर्माण होत आहे. 
- डॉ. अनंतभूषण रानडे, कर्करोगतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research by Pune-based cancer expert has concluded that there is a risk of future cancer