शिवसृष्टी प्रकल्प विरोधात रहिवाशांची निदर्शने; मोजणी करणारे माघारी फिरले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नियोजित शिवसृष्टीसाठी चांदणीचौकातील बीडीपी आरक्षणातील जागेची मोजणी करण्यासाठी अधिकारी येणार आहे असे समजल्याने स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर येवून जोरदार निदर्शने केली. नागरिकांचा रोष लक्षात घेवून मोजणीसाठी आलेले अधिकारी मोजणी न करताच निघून गेले. 

पौडरस्ता : नियोजित शिवसृष्टीसाठी चांदणीचौकातील बीडीपी आरक्षणातील जागेची मोजणी करण्यासाठी अधिकारी येणार आहे असे समजल्याने स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर येवून जोरदार निदर्शने केली. नागरिकांचा रोष लक्षात घेवून मोजणीसाठी आलेले अधिकारी मोजणी न करताच निघून गेले. 

लहान मुले, वृध्द, कामगार, महिला यांनी ‘आम्ही जायचे कोठे’ असे लिहिलेला फलक उंचावत प्रशासनाच्या कृतीचा निषेध केला. चांदणीचौकाच्या जवळच सरकारी मालकीची शंभर एकर जागा मनपाच्या देखरेखीखाली पडून आहे. ही जागा शिवसृष्टीसाठी ताब्यात घ्यावी. लोकांची घरे उध्वस्त करुन कोणाला फायदा होणार आहे असा प्रश्न नागरिकांनी अधिकाऱ्यांना  विचारला.

येथील रहिवाशांनी सांगितले की, शिवसृष्टीसाठी तीन वेळा जागा बदलण्यात आली. दहा वर्षे शिवसृष्टीचे काम रखडले आहे. आमची मागणी धुडकावून आम्हाला बेघर करण्याचा अट्टाहास का चालवला आहे. तो कोणाच्या फायद्यासाठी? आहे हे स्पष्ट करावे अशी आमची मागणी आहे. आमच्या येथे शिवसृष्टी केली तर चांदणी चौकात जाणारा एकच जोड  रस्ता मिळेल. मात्र पाषाण टेकडीवर जायला पाच बाजूला जोड रस्ते व रोप वे बनवता येईल.

राजेंद्र शिंदे म्हणाले की, एका छोट्या कागदावर आम्हाला मोजणीची नोटीस पाठवली आहे. आम्ही आंदोलन करणार याची कुणकुण लागल्याने अजूनही अधिकारी येथे आले नाही. पर्यायी जागा उपलब्ध असताना आम्हाला बेघर करण्याचा जो डाव रचलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो.

मानवेंद्र वर्तक म्हणाले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य  किल्ले मोडकळीस आले असताना पुण्यात महाराजांचे नाव वापरून पन्नास एकर जागेतील अडिचशे कुटुंबातील हजार नागरिकांना बेघर करून, रस्त्यावर फेकून उध्वस्त करण्यासाठी सारे राजकारणी एकत्र आले आहेत. आम्ही शेवट पर्यंत याला विरोध करू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Residents protest against Shiv Srishti project at chandani chwok in Pune