पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत पीएमपीच्या सेवेला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून पीएमपीने गेल्या सहा दिवसांत दैनंदिन एक लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला असून, उत्पन्न १७ लाखांपर्यंत पोचले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत पीएमपीच्या सेवेला आता प्रतिसाद मिळू लागला आहे

पुणे - प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून पीएमपीने गेल्या सहा दिवसांत दैनंदिन एक लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला असून, उत्पन्न १७ लाखांपर्यंत पोचले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत पीएमपीच्या सेवेला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन शिथिल झाल्यावर पीएमपीची प्रवासी वाहतूक ३ सप्टेंबरपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी सुमारे ६५ हजार प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. त्यानंतर प्रवासी संख्या ७० हजारांवरून ९० हजारांवर पोचली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीची बससेवा नियमितपणे सुरू झाल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. त्यामुळे सोमवारपासून (ता. ७) प्रवासी संख्या एक लाखावर पोचली. गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी संख्या १ लाख १० हजारांवर पोचली आहे. ही संख्या वाढल्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. सध्या पीएमपीचे उत्पन्न १७ लाखांवर पोचले आहे. प्रशासनाने मंगळवारपासून ६५ वर्षांवरील प्रवाशांनाही प्रवासाची मुभा दिली आहे. त्याचाही प्रवासी संख्या वाढण्यावर परिणाम झाला आहे, असे निरीक्षण प्रशासनाने नोंदविले. 

आठ मार्गांवर गर्दी 
निगडी, भोसरी, कात्रज, हडपसर, सिंहगड रोड, वारजे माळवाडी, विश्रांतवाडी मार्गांवर वाहतूक करणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. त्यामुळे त्या मार्गांवरील बस गर्दीच्या वेळेत भरून वाहत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात या मार्गांवरील बस संख्येत वाढ करावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मला रोज धनकवडीतून स्टेशनला कामाला जावे लागते. माझ्याकडे दुचाकीही नाही. रिक्षा परवडत नाही, त्यामुळे मला पीएमपीशिवाय पर्याय नाही. पीएमपी बस सुरू झाल्याने माझी रोज होणारी गैरसोय दूर झाली.
- सोमेश रत्नापुरे, धनकवडी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to PMP service in both Pune and Pimpri Chinchwad