

खळद, ता. १८ : सासवड-जेजुरी पालखी महामार्गावरील टोल वाचविण्यासाठी पीएमटी प्रशासनाने बसचा मार्ग बदलल्याने खळद, शिवरी, वाळुंजसह परिसरातील विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. ही बससेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बेलसर हद्दीतील तक्रारवाडी फाट्याजवळ टोलनाका सुरू झाल्यापासून पीएमटीने आपला मार्ग कुंभारवळण, खानवडी, बेलसरमार्गे वळवला आहे. यामुळे पालखी महामार्गालगत असलेल्या गावांतील प्रवाशांना दळणवळणासाठी कोणताही पर्याय उरलेला नाही. या भागात औद्योगिक वसाहती आणि शैक्षणिक संस्थांची संख्या मोठी असल्याने महिला कामगार आणि विद्यार्थ्यांना सासवडला जाण्यासाठी तासन् तास खासगी वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एसटी बसला टोल परवडतो, मग पीएमपीएलला का नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने जुन्या आणि नवीन अशा दोन्ही मार्गांवर बसचे नियोजन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पीएमपीएल बससेवा बंद झाल्यामुळे वेळेवर कॉलेज, ऑफिसला पोहोचणे खूप कठीण झाले आहे. ये-जा करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे वेळ, पैसे आणि मानसिक त्रासही वाढत आहे.
- मोनाली प्रशांत कामथे, सहाय्यक प्राध्यापक.
आमच्या परिसरातील बससेवा बंद झाल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्षा, एस. टी. बस किंवा खासगी वाहनांसाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने कॉलेजला उशीर होतो आणि दैनंदिन वेळापत्रकावर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन परिसरातील बससेवा तातडीने पूर्ववत करण्यात यावी, ही नम्र विनंती.
- सेजल म्हस्के, विद्यार्थिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.