esakal | पुण्यातील हाऊसिंग सोसायटीत बाहेरील नागरिकांना 'नो एन्ट्री'
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Housing Society

पुण्यातील हाऊसिंग सोसायटीत बाहेरील नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सोसायटी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच, सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना (आरटीपीसीआर) चाचणी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी राहील. याबाबत सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात यावा. सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी करण्यात यावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करून घेण्यात यावे. सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सहायक आयुक्त जाहीर करतील. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, नियमांचे पालन होते की नाही, याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायटीवर दहा हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा - कोरोनाचा संसर्ग वाढला; वारजे कर्वेनगर भागात २३ मायक्रो कन्टेन्मेंट झोन

पार्सल मुख्य प्रवेशद्वारावरच
घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इमारतीमध्ये एकापेक्षा जास्त कुटुंबांना पार्सल द्यावयाचे असल्यास ते सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर द्यावे. ते पार्सल सोसायटीतील कर्मचाऱ्यामार्फत देण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सोसायटीतही फिरण्यावर प्रतिबंध
गृहनिर्माण सोसायटीमधील जिम, स्वीमिंग पूल आणि क्लब हाउस वापरण्यास यापूर्वीपासूनच प्रतिबंध आहे. आजपासून एक मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत सोसायटीतील नागरिकांना उद्यान आणि आवारातही फिरण्यावर प्रतिबंध राहणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.