रिक्षाच्या रंगात मनमानी बदल; आरटीओकडून कारवाई शून्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

अबोलीच रंग हवा
पुणे व महापालिका क्षेत्रात महिलांसाठी एकूण १५० परवाने राखीव ठेवण्यात आले होते. सुरुवातीला अबोली रंग न दिलेल्या रिक्षाचालकांना आरटीओने नोटिसाही बजावल्या होत्या. मात्र, रंग निश्‍चित झाल्यानंतर तसे हमीपत्रही महिला चालकांकडून भरून घेतले होते. त्यामुळे या सर्व रंगांना अबोली रंगच असणे अपेक्षित आहे.

पिंपरी - रिक्षा परवान्यांमध्ये पाच टक्के आरक्षणाच्या बहुचर्चित निर्णयाला महिलाच हरताळ फासत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून ‘अबोली’ रंगाच्या रिक्षा सुरू झाल्या, पण महिला चालकांनी बनवेगिरी करून आरटीओचे नियम धाब्यावर बसवत रंग बदलून कुटुंबातील इतर सदस्यांना वा नातेवाइकांना चालविण्यासाठी दिल्या आहेत. मुख्य म्हणजे आरटीओने अद्याप एकही कारवाई केलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अबोली रिक्षांचे जवळपास शंभरच्यावर परवाने महिलांना दिले. पिंपरी, चिंचवड, भोसरी तसेच अजमेरा कॉलनी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या परिसरात बदललेल्या रंगाच्या रिक्षा सर्रास दिसत आहेत. काही रिक्षांचे क्रमांकही गायब आहेत.

या रिक्षांचे वाटप झाल्यानंतर काही दिवसांतच महिलांनी रिक्षा चालविणे बंद केले. यातील निम्म्यांच्यावर रिक्षा पुरुष चालविताना दिसतात. बहुतांश महिला रिक्षाच चालवीत नसल्याचा गैरफायदा घेत काही चालकांनी शक्कल लढवून रिक्षांचा रंगच बदलून टाकला. त्यामुळे परवाना नसलेल्यांकडेही अबोली रिक्षा असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्धा गुलाबी, अर्धा काळा, पिवळा असे रंग बदलले गेले. काही रिक्षांचा गुलाबी रंग उडाल्याने काळा-पिवळा अशा अर्धवट रंगाच्या रिक्षाही दिसतात, त्यामुळे ही रिक्षा नेमकी अबोली की काळी-पिवळी असा संभ्रम प्रवाशांना होतो.

फिकट गुलाबी, गुलाबी व अबोली रंगांच्या रिक्षा चालविणाऱ्या चालक महिलांनी पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून इरादा पत्रही नेले. बऱ्याच महिलांनी या वेळी रिक्षाच्या रंगामध्ये बदल नको असल्याची मागणीही केली होती, सुरवातीला केवळ गुलाबी रंगाच्या सहा रिक्षांना मान्यता देण्यात आली होती. नंतर ही संख्या वाढली, पण अखेरीस गैरप्रकारही वाढले.

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विनोद सगरे म्हणाले ‘‘आपल्या नावे परवाने असलेल्या रिक्षा महिलांनीच चालविणे आवश्‍यक आहे. रंगामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आम्ही कारवाई करताना सर्वच नियम पाहतो. हा गंभीर प्रकार आहे. आमच्या पथकाला मी पाहणी करण्यास सांगतो’’.

अबोली रंगाच्या रिक्षांचा कोणी गैरवापर करत असेल तर ते चुकीचे आहे. मात्र, काही महिलांनी बाळंतपणाच्या कालावधीत तसेच वैयक्तिक अडचणीत रिक्षा बंद ठेवल्या होत्या. ज्या महिलांचे बॅंकेचे हप्ते थकलेले आहेत त्या महिलांनी रिक्षा पुरुषांना चालविण्यासाठी दिल्या आहेत; अन्यथा हप्ते न भरल्यास रोजगार जाण्याचीही भीती आहे. यात चुकीचे काही नाही. यामध्ये सर्व गोरगरीब व कष्टकरी महिलाच आहेत. मुळातच रिक्षाचा रंग हा काळा-पिवळाच हवा. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन या महिला काम करत आहेत, त्यासाठी रिक्षाचा रंग वेगळा कशासाठी हवा?
- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रिक्षा पंचायत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw Colour Cahnes Issue