

रिक्षा पासिंग बंदमुळे चालक हवालदिल
कऱ्हाडला संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात; दैनंदिन कमाई, बँक हप्त्यांसह घरखर्चावरही कुऱ्हाड
सचिन शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. १६ : सकाळी लवकर घराबाहेर पडून दिवसभर राबायचं आणि संध्याकाळी हातात पडणाऱ्या चार पैशांवर घरची चूल पेटवायची, असा कऱ्हाडमधील अनेक रिक्षाचालकांचा रोजचा दिनक्रम. मात्र, काही दिवसांपासून कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा पासिंग अचानक बंद ठेवले आहे. त्यामुळे शेकडो रिक्षाचालकांच्या पोटावर थेट पाय आला आहे. पासिंगअभावी रिक्षा रस्त्यावर उतरवता येत नसल्याने त्यांची दैनंदिन कमाई पूर्णपणे ठप्प झाली आहेत. रिक्षाचा हप्ता भरायचा की कुटुंबाचं पोट भरायचं, असा प्रश्न अनेक रिक्षाचालकांमोर निर्माण झाला आहे.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पासिंग वेळेत होणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. असे असतानाही आरटीओ कार्यालयात पासिंगची प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी प्रियदर्शनी कऱ्हाड तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अशोकराव पाटील यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात तातडीने पासिंग सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, संवेदनशील बनलेल्या प्रश्नाकडे आणि संघटनेच्या मागण्यांकडे आरटीओ प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या मागण्यांच्या निवेदनाला थेट केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या ढिम्म कारभाराविरोधात रिक्षाचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. पासिंग नसताना रिक्षा चालवल्यास पोलिसांच्या कारवाईची भीती आणि अपघात झाल्यास विम्याचे संरक्षण न मिळण्याचा धोका असल्याने अनेक चालकांनी गाड्या घरीच उभ्या केल्या आहेत. यामुळे रोजची कमाई बुडत असल्याने चालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
............................................
स्क्रॅप रिक्षांची बिनधास्त धाव
शहरात १५ वर्षांहून जुन्या स्क्रॅप रिक्षा आणि विना-कागदपत्रे वाहने बिनधास्त धावत असताना, कायदेशीर मार्गाने पासिंग करू इच्छिणाऱ्या चालकांना मात्र आरटीओच्या मनमानी कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याची तयारीही संघटनेने चालवली आहे.
................................................
कमाई ठप्प अन् आर्थिक संकट गडद
प्रवाशांची ने-आण करण्यासाठी रिक्षा पासिंग असणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असताना, प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे गाड्या विनापासिंग घरीच उभ्या ठेवाव्या लागत आहेत. यामुळे रोजचा हप्ता, पेट्रोलचा खर्च आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा? या विवंचनेत चालक सापडला आहे.
......................................
चौकट
अशा आहेत मागण्या
- रखडलेले पासिंगचे काम पूर्ववत करून आर्थिक नुकसान थांबवावे.
- परमीट व इरादा पत्राच्या नूतनीकरणातून रिक्षाचालकांना हक्काचा रोजगार द्यावा.
- रिक्षांना सातारा जिल्हा परमीट द्यावे आणि कच्चे परमीटचे नूतनीकरण करावे.
- परिसरात १५ वर्षे पूर्ण झालेल्या स्क्रॅप रिक्षा, पासिंग, इन्श्युरन्स, पीयूसी, लायसन्स-बॅच नसणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
----------
PNE26W65875
कऱ्हाड ः शहरातील रिक्षा.
..............................................
सचिन शिंदे...21:01 14-11-2026
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.