#RingRoad रिंगरोडमधून मेट्रो शक्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

असा असेल दुसरा टप्पा
एमएसआरडीसीकडून पहिल्या टप्प्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम घेण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मूळ, सानोरी, दिवे, चांबळी, हिवरे, गराडे, कांबरी, वरवे बुद्रुक असा असणार आहे.

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंगरोडच्या मधोमध तीस मीटर रुंदीची जागा राखीव ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात रिंगरोडच्या मध्यातून रिंग रेल्वे, मेट्रोसारखे प्रकल्प पीएमआरडीएला राबविणे शक्‍य होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले. तसेच त्यास राज्य सरकारकडून मान्यता दिली असून त्याला ‘राज्य महामार्गाचा दर्जा’ मिळाला आहे. या मार्गाचे सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

एमएसआरडीसीच्या या प्रस्तावित रिंगरोडची लांबी सुमारे १३२ किलोमीटर असून ११० मीटर रुंदी आहे. ही रुंदी नव्वद मीटर करण्याचे प्रस्तावीत आहे. खेड शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्‍यातून हा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी २३०० हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये एकट्या भूसंपादनासाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रिंगरोडच्या मधोमध तीस मीटर रुंदीची जागा राखीव ठेवली आहे. पहिल्या टप्प्यात साठ मीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. भविष्यात गरज पडल्यास रिंगरोडची रुंदी वाढणे शक्‍य व्हावे, हादेखील त्याचा उद्देश आहे. पीएमआरडीएने हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यात मेट्रो, रिंग रेल्वे, बीआरटीसह अनेक प्रकल्प प्रस्तावीत केले आहेत. रिंगरोड शहरात येणाऱ्या अनेक चार बाजूच्या महामार्गांना तसेच औद्योगिक वसाहतींच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प राबविणे सोयीचे व्हावे, या हेतूने ही जागा राखीव ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ringroads can be metro