Rishi Sunak : इंग्लंडमधील भारतीयांचा उर अभिमानाने आला भरून ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Sunak Indian was elected as Prime Minister of England proud movement for Indians

Rishi Sunak : इंग्लंडमधील भारतीयांचा उर अभिमानाने आला भरून !

पुणे : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची इंग्लंडच्या पंतप्रधान पदावर निवड झाल्यामुळे तेथील भारतीयांनी दिवाळीतच दिवाळी साजरी केली. अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी आता तरी रुळावर येईल, अशी अपेक्षाही तेथील भारतीयांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. ज्या देशाने भारतावर प्रदीर्घ काळ राज्य केले, तेथे आता भारतीय वंशाचा माणूस पंतप्रधान होणार, ही बाब भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली.

इंग्लंडच्या पंतप्रधानपदी सुनक यांची सोमवारी सायंकाळी निवड जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील भारतीयांशी सकाळने संवाद साधला. त्यावेळी भारतीयांचा अभिमानाने भरून आल्याचे जाणवले.

"रिशी सुनक हे पहिले भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान असणे, ही माझ्यासारख्या भारतीय वंशाच्या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अर्थात, देश सध्या आर्थिक तसेच राजकीय संकटातून जात आहे; मंत्रिमंडळात असण्याचा आणि कोषागाराचा कारभार पाहण्याचा रिशी यांचा पूर्वीचा अनुभव त्या आव्हानांवर मात करण्यास मदत करेल अशी आशा आहे. मी यासाठी सुद्धा आनंदी आहे कारण मी त्या साऊथहॅम्पटन शहरात राहते जिथे रिशी लहानाचे मोठे झाले आणि या शहराशी त्यांचं जवळचं नातं आहे."

- डॉ ग्लोरिया खामकर, सिनियर लेक्चरर इन जर्नालिझम, बौर्नमौथ युनिव्हर्सिटी, यूके

- "लक्ष्मीपूजना"च्या दिवशी, नवीन आश्वासक पंतप्रधान रिशी सुनक यांच्यासोबत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला आशीर्वाद देण्याच्या "लक्ष्मीच्या" हेतूची चिन्हे ब्रिटनमध्ये दिसत आहेत. रिशी सुनक यांच्यासाठी रस्ता आपण कल्पना करू शकतो त्यापेक्षा खडतर असेल. परंतु, मला पूर्ण विश्वास आहे की ते या देशाला योग्य मार्गावर आणू शकतील. शेअर बाजारात काही प्रमाणात सुधारणाहोण्याची चिन्हे आधीच दिसू लागली आहेत."

- निशिकांत ताकसांडे, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, बार्कलेज, यूके

-"रिशीने ब्रिटनचा पंतप्रधान बनणं ही एक विलक्षण घटना आहे. ब्रिटिश समाजव्यवस्था आणि राजकारण एका कर्तबगार, सुशिक्षित आणि लायक माणसाला निवडू शकते यात कधीच शंका नव्हती. ती व्यक्ती भारतीय वंशाची असणं हे मात्र नवल आहे. रिशी आपल्या भारतीय संस्कारांना न लपवता किंवा कुठेही न्यूनगंड न बाळगता या समाजात प्रगती करतो हा जगातील सर्व भारतीयांकरता एक आदर्श आहे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे."

- डॉ सुधांशु पटवर्धन, कॅन्सर प्रिव्हेंशन तज्ज्ञ, सेंटर फॉर हेल्थ रिसर्च अँड एज्युकेशन, यूके

- ऋषी सुनक ब्रिटन चे पंतप्रधान झाल्याचे ऐकल्यावर खूप आनंद झाला..भारतीय वंशाची वक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकते आणि ते पण खूप मोठ्या मताधिक्याने.... आता ते कॉन्सरवटिव्ह पक्षाचे प्रमुख नेते असतील.. ऋषी सुनक यांनी ब्रिटिश संसदेत भगवदगीतेला स्मरून यॉर्कशायरचे खासदार म्हणून शपथ घेतली. असे करणारे ते पहिले ब्रिटनचे खासदार होते याचा सर्वानाच खूप अभिमान आहे..सुनक पंतप्रधान होणे हे भारतीय अर्थव्यवस्तेला पूरक असतील असं मला वाटते कारण त्यांची अनेक भारताबाबतीचे धोरणं सकारात्मक आहेत.. ते ब्रिटनचे एक्स -चॅन्सलर होते, अर्थव्यवस्तेचा गाढा अनुभव त्यांच्या मागे आहे.. ते नक्कीच ब्रिटनला मंदीतून सावरतील. बोरिस जॉन्सनच्या राजीनाम्यानंतर जेव्हा सुनक पंतप्रधानपदासाठी लिझ ट्रसच्या विरोधात लढत होते, तेव्हा ऋषींनी इमिग्रेशन आणि एनएचएसला त्यांच्या अजेंडाच्या शीर्षस्थानी ठेवले. मात्र, आता त्याच्या हातावर आर्थिक संकट अधिक आहे. त्यांनी यूकेच्या रवांडा योजनेला वचनबद्ध केले आहे आणि या योजनेची इतर देशांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे संकेत दिले आहेत.

सुनक यांनी स्थलांतराला परराष्ट्र धोरणाशी जोडण्याबाबतही बोलले आहे - जे देश स्थलांतरितांच्या परतण्यावर यूकेशी सहयोग करतात त्यांना मदत, व्यापार आणि व्हिसा दिला जाईल, ही खूप मोठी धोरणं आहेत त्याच्यामुळे कॉन्सरवटिव्ह पार्टी मध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत किंवा मॅन तो गो फॉर असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दुसरी प्रस्तावित कल्पना म्हणजे साथीच्या रोगानंतर मोठ्या NHS अनुशेषाला मदत करण्यासाठी GP अपॉइंटमेंट चुकवल्याबद्दल सार्वजनिक 10 पौंड दंड आकारणे.

ऋषी सुनक नेहमीच ब्रेक्झिटसाठी एक मजबूत आवाज होते आणि कायमच इमिग्रेशन कायदे कडक करण्याच्या आणि उच्च दराच्या कर ब्रॅकेटमध्ये वाढ करण्याच्या बाजूने होते.. त्याची अशी अनेक धोरणं अर्थव्यवस्तेला मंदीच्या खाईतून बाहेर काढणारी असतील...

- अक्षय रत्नपारखे, लंडन