महागाईवरून काँग्रेसचे टीकास्त्र

महागाईवरून काँग्रेसचे टीकास्त्र
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २१ : खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्या महिनाभरात मसाले, डाळी आणि खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. महागाईमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरील आर्थिक भार वाढत असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
जयराम रमेश यांनी सोशाल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या महिन्यात मसाल्यांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. छोटी वेलची चार हजार रुपयांवरून ४,४०० रुपये किलो, मोठी वेलची २,४०० रुपयांवरून २,८०० रुपये किलो, तर जिऱ्याचे दर ३६० रुपयांवरून ४०० रुपये किलो झाले आहेत. तूरडाळ, चणाडाळ, उडीद डाळ वीस ते तीस रुपयांनी महागल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला. खाद्यतेलही प्रतिलिटर वीस ते चाळीस रुपयांनी महागल्याचेही त्यांनी नमूद केले. जून ते सप्टेंबरदरम्यान देशातील कांद्याच्या सरासरी किरकोळ दरात मोठी वाढ झाल्याकडे लक्ष वेधताना जयराम रमेश यांनी म्हटले, की जूनमध्ये २९ रुपये ५० पैसे किलो असलेला कांद्याचा अखिल भारतीय सरासरी किरकोळ दर सप्टेंबरमध्ये ५३ रुपये ७८ पैसे किलो झाला. म्हणजेच साडेतीन महिन्यांत कांद्याच्या दरात ८२.३ टक्के वाढ झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
वाढत्या महागाईमुळे गरीब कुटुंबांच्या आवाक्याबाहेर डाळी आणि अन्य जीवनावश्यक खाद्यपदार्थ जात असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी ‘अच्छे दिन’चे आश्वासन कुठे गेले, असा सवाल केला. ही टीका करताना त्यांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ या प्रसिद्ध चित्रपटगीताचा आधार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com