परदेशी तणांचा वनस्पतींना धोका

plant
plant

उपद्रवी परदेशी तणांमुळे स्थानिक वन आणि जल परिसंस्थांचा पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. परिणामी, स्थानिक वनस्पती दिवसेंदिवस नष्ट होत आहेत. या उपद्रवी तणांमुळे पिकांचे उत्पादन करणे, तणांद्वारे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव, तणनाशकांमुळे जमिनीचा पोत कमी होणे आणि भूजल प्रदूषणासारखे प्रश्‍न निर्माण होत आहेत. या परदेशी तणांमुळे ‘हिरवा दहशतवाद’ फोफावत असल्याचे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. वन्यजीव अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांच्याकडून याबाबत जाणून घेऊयात.
- मीनाक्षी गुरव

कुठल्याही शेतामध्ये अथवा फळबागांमध्ये अनावश्‍यक वाढणाऱ्या वनस्पती म्हणजे ‘तण’. या तणांचा उपद्रव वाढत आहे. वन-तणे, जल-तणे आणि शेती-तणे असे त्याचे विविध प्रकार आहेत. तण हे देशी आणि परदेशी असतात. उपद्रवी परदेशी तणांमुळे स्थानिक वन आणि जल परिसंस्थांचा पर्यावरणीय समतोल बिघडत असल्याचे गेल्या काही दशकांत दिसून आले आहे. मात्र, या उपद्रवी तणांचा प्रसार इतर देशांकडून हेतुपुरस्सर होत असल्याचे डॉ. पुणेकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जैविक युद्धच खेळले जात आहे का, अशी शंका येते. पर्यावरणीय दृष्टिकोनातून वैविध्याने नटलेल्या देशाला उपद्रवी तणांच्या माध्यमातून कमकुवत करण्याचा डावच इतर परदेशी यंत्रणांचा आहे का, असे विचार पर्यावरण अभ्यासकांच्या मनात आता डोकावू लागले आहेत.
या तणांचे वेळीच नियंत्रण न केल्यास त्याचे पर्यावरणीय धोके मोठे आहेत. शिवाय आर्थिक नुकसान आणि उत्पादनावर होणारा परिणाम मोठा आहे. याबद्दल डॉ. पुणेकर म्हणाले, ‘‘पश्‍चिम घाटातील सदाहरित आणि निम सदाहरित वने मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने, जंगले उघडी केल्यामुळे रानमारीसारखी वनस्पती फोफावली. त्यामुळे त्या वनस्पतींवर तांबा किंवा किट्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या. या किट्या माणसांमध्ये ‘माकडताप’ या विषाणूंच्या वाहक म्हणून वाढू लागल्या आहेत. जलाशयांमध्ये सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे जलपर्णीसारख्या वनस्पती फोफावतात. दख्खनच्या पठारावर असणाऱ्या विस्तृत गवताळ कुरणांवरदेखील वेडीबाभूळ मोठ्या प्रमाणात मजल्याने चराऊ कुरणे कमी झाली आहेत. परिणामी तृणभक्षी प्राणी शेतपिकांकडे वळल्याने माणूस आणि वन्य प्राण्यांमधील संघर्षात भर पडत आहे.’’

तण वनस्पती सहसा आक्रमक असतात आणि विशेषत: लागवड केलेल्या प्रजातींवर प्रभाव पाडणाऱ्या असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या लागवड केलेल्या प्रजातींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करतात. महाराष्ट्रात जवळपास दीडशे प्रजातींची आतापर्यंत नोंद झाली आहे. परंतु, त्याचा समग्र अभ्यास अभावानाचे झाल्याचे आढळून येते. डॉ. पुणेकर म्हणाले, ‘‘खरंतर या उपद्रवी तणांमुळे पिकांची गुणवत्ता ढासळत आहे. त्याशिवाय जमिनीची सुपीकता कमी होण्याला देखील या कारण ठरत आहेत.’’

विविध प्रकारची उपद्रवी तणे :-
 वन तणे : रानमारी, उंदीरमारी, टणटणी (घाणेरी), सुबाभूळ, कॉसमॉस (सोन कुसुम), टिथुनिया (कनकगोल), लाजाळू, वेडीबाभूळ.
 जल तणे : जलपर्णी, पिवळा धोतरा (सत्यानाशी), जलकुंभी, बेशरम (महानंद).
 शेती तणे : धनुरा (गाजर गवत/ चटक चांदणी), हरळी, लव्हाळा, चुबुक काटा, बोथरी.

 काय करणे अपेक्षित
 तणांचे समूळ उच्चाटन
  पीकलागवड पद्धतीत सुधारणा
  जैविक तणनाशकांचा वापर
  स्थानिक कीटक व वनस्पतींद्वारे तणांचे नियंत्रण
  वन व्यवस्थापनामध्ये योग्य तो शास्त्रीय दृष्टिकोन
  ‘हटवा तण, वाचवा वन’ अभियान राबविणे

देशात अनवधानाने आलेल्या तणांच्या प्रजाती 

देशाचे नाव    तण वनस्पतीच्या प्रजातींची संख्या
 दक्षिण अमेरिका    ०६
 उष्ण कटिबंधीय अमेरिका    ११
 आशिया    १५
 शीतकटिबंधीय देश    ०६
 मॅक्‍सिको    ०२
 युरेशिया    ०५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com