कोरोनानंतर द्या 'साखरे'कडे लक्ष; तात्पुरत्या डायबिटिसचा धोका

सम्राट कदम
Sunday, 27 September 2020

कोरोना उपचारासाठी दाखल रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळत असल्याचे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. आरती किणीकर सांगतात. तसेच, त्यातून काही काळापुरता का होईना रुग्णांना "मधुमेह प्रकार-1' उद्भवत असल्याचे "डायबेटिक केअर' या आतंरराष्ट्रीय शोधपत्रिकेतील शोधनिबंध सांगतो. परंतु हा दीर्घकाळ टिकतो का नाही, हे स्पष्ट करेल असे पुरावे अजून हाती आलेले नाहीत. 

पुणे : शहरातील मध्यवस्तीत राहणारी 50 वर्षाची पुरुष व्यक्ती. सलग पाच दिवसांपासून ताप येणे, पोटात दुखणे आदी आजारांमुळे ग्रस्त होती. शंका म्हणून कोरोनाची चाचणी करते तर ती पॉझिटिव्ह येते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसातच एकाच वेळी चार आजारांमुळे (कोमॉर्बिडीटी) मृत्यू होतो. साखरेची वाढलेली पातळी आजारांची गुंतागुंत वाढवत रुग्णाला मृत्यूच्या दारात नेत असल्याचा निष्कर्ष डॉक्‍टर काढतात. 

कोरोना उपचारासाठी दाखल रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळत असल्याचे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. आरती किणीकर सांगतात. तसेच, त्यातून काही काळापुरता का होईना रुग्णांना "मधुमेह प्रकार-1' उद्भवत असल्याचे "डायबेटिक केअर' या आतंरराष्ट्रीय शोधपत्रिकेतील शोधनिबंध सांगतो. परंतु हा दीर्घकाळ टिकतो का नाही, हे स्पष्ट करेल असे पुरावे अजून हाती आलेले नाहीत. 

का होतो मधुमेह? 
- कोरोना विषाणूंच्या शरीरावर ग्लायकोप्रोटीन असते.
- पेशींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी हे ग्लायकोप्रोटीनी 'एसीई-2' या एन्झाईमसोबत अभिक्रिया करते.
- याचा थेट परिणाम ग्लुकोज निर्मितीशी निगडित चयापचयावर होतो.
- परिणामी मधुमेह प्रकार-1 किंवा मधुमेह किटोऍसिडोसीस (ग्लूकोजचा अभाव) होतो. 

हा मधुमेह जास्त काळ टिकतो का? 
उपचारादरम्यान झालेला मधुमेह जास्त काळ टिकेलच असे नाही. त्यासाठी वारंवार साखरेवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे डॉ. किणीकर सांगतात. उपचारादरम्यान वाढलेली रक्तातील साखर नंतर कमी होताना पहायला मिळते. बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर जास्त काळ लक्ष दिल्यावर कदाचित त्यातून काही निष्कर्ष समोर येईल, असेही त्या म्हणाल्या. 

उपचारावर परिणाम होतो का? 
कोरोना बाधित रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यास तो अत्यवस्थ (क्रिटिकल) होण्याची शक्‍यता असते. काही वेळेस इन्शुलिनही देण्याची गरज येते. अशा वेळी रुग्ण दगावण्याची शक्‍यताही वाढत असल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले. 

काय काळजी घ्याल? 
कोरोना उपचारावेळी मधुमेह जेंव्हा होतो तेंव्हा रुग्ण रुग्णालयातच असतो. त्यामुळे डॉक्‍टर घरी जाताना आरोग्यावर लक्ष ठेवण्याचा आणि नियमित तपासणीचा सल्ला देतात. आधीच मधुमेह किंवा जीवनशैलीशी निगडित आजार असलेल्या रुग्णांनी व्यायाम, आहार आणि औषधांकडे लक्ष द्यावे. मध्येच रक्तातील साखर कमी झाली तर ग्लुकोज जवळ असणे गरजेचे, असल्याचे डॉक्‍टर सांगता. 

''लहानमुलांसह ज्येष्ठांमध्येही कोरोनामुळे पहिल्यादीच मधुमेह झालेला पहायला मिळतो. आजारामुळे किंवा उपचारादरम्यान दिलेल्या औषधांमुळेही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. शक्‍यतो हा मधुमेह तात्पुरत्या स्वरूपाचा असतो.''
- डॉ. आरती किणीकर, बालरोगतज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk of temporary diabetes so pay attention to sugar After corona