‘नदी सुधार’ला प्राधान्य देणार - बारणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

‘आगामी पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये पाणी, नदी सुधार, रेल्वे याबरोबरच अन्य विकासकामे वेगाने मार्गी लावणार आहे,’’ असे आश्‍वासन नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिले.

पिंपरी - ‘आगामी पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये पाणी, नदी सुधार, रेल्वे याबरोबरच अन्य विकासकामे वेगाने मार्गी लावणार आहे,’’ असे आश्‍वासन नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिले. 

बारणे म्हणाले, ‘‘मावळ मतदारसंघात कर्जत, खालापूर, मावळ तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यावर भर देणार आहे. काही ठिकाणी केंद्रीय जल योजनेतून पाणी आणण्याचे काम करणार आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड आणि पनवेल परिसरातील पाण्याचा गंभीर प्रश्‍नही मार्गी लावणार आहे. शहरातील नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेला ग्रामीण भागात प्राधान्य देणार आहे.’’

मेट्रो आणि रेल्वे याबाबतचे प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे सांगून बारणे म्हणाले, ‘‘पनवेल ते कर्जत यादरम्यान लोकलसेवा सुरू करणार आहे.

मावळमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी निधी आणणार आहे. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडून पॅकेज आणणार आहे. या कारखान्यातील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, गजानन चिंचवडे, योगेश बाबर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: River Development Project Priority Shrirang Barne