#PMCIssue पुण्यात रस्ता फुगला

#PMCIssue पुण्यात रस्ता फुगला

पुणे - रस्ता बनवला चोवीस मीटर रुंदीचा; पण उखडताना त्याची रुंदी भरली तीस मीटर...असं कधी होऊ शकेल का, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. मात्र, महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांनी जादूची कांडी फिरवत रस्ता फुगवला ते केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी! ...मग आपले हे कारस्थान चर्चेत येताच संबंधित ठेकेदाराला जुन्या तारखेची बिले देण्याचा खटाटोप करीत ‘आम्ही त्यातले नव्हे,’ हे दाखविण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत. अधिकाऱ्यांची आपल्यावर नेहमीच मेहरनजर राहत असल्याने ठेकेदारही अधिकाऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे.

ही आगळीक आहे नदीपात्रालगतच्या रस्त्याबाबतची. विकास आराखड्याची (डीपी) अंमलबजावणी करीत कर्वे रस्त्याला पर्याय म्हणून महापालिकेने विठ्ठलवाडी ते वडगावपर्यंत हा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता २००९ मध्ये निविदा काढण्यात आली. निविदेत रस्त्याची रंदी होती २४ मीटर. त्यानुसार २०११ मध्ये रस्त्याचे काम झाले. 

दरम्यान, शहरातील पर्यावरणप्रेमींनी हा रस्ता हरितपट्ट्यात (ग्रीन बेल्ट) असल्याचा आक्षेप घेत राष्ट्रीय हरित प्राधिकरणात धाव घेतली. त्यावर हा रस्ता उखडून टाकण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला. या आदेशानुसार महापालिकेने रस्ता उखडण्यासाठी निविदा काढल्या. या निविदेत मात्र रस्ता ३० मीटर असल्याचे म्हटले आहे. निविदा मंजूर करून संबंधित ठेकेदाराला चार कोटी रुपये देण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले. अधिकारी आणि नगरसेवकांनी ठेकेदाराला हाताशी धरून या निविदाप्रक्रियेची आणि वस्तुस्थितीची वाच्यता होणार नाही, याचीही काळजी घेतली. निविदा तातडीने मंजूर करून बिलही अदा केले. चोवीस मीटरचा रस्ता सहा मीटरने फुगवून तो तीस मीटर रुंदीचा दाखविल्याने तो उखडण्यासाठीचा खर्चही आपोआप वाढेल, असे अंकगणित मांडून अधिकाऱ्यांनी हा उद्योग केला आहे.  यातून अधिकारी आणि नगरसेवकांचेही खिसे फुगले आहेत. जेमतेम पावणेदोन किलोमीटर लांबीचा रस्ता उखडण्यासाठी चार कोटी रुपये खर्च हादेखील संशोधनाचा विषय आहे. या रस्त्याच्या बांधणीसाठी १६ कोटी रुपये खर्च झाल्याचा हिशेब आहे. तर, तो उखडण्यासाठी तब्बल चार कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, रस्ता उखडण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली असून, निविदेप्रमाणे काम झाल्याचा शेरा संबंधित खात्याने दिला आहे. पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी मागविलेल्या माहितीतून रस्त्याच्या कामातील गोंधळ उघड होऊ लागला आहे.  

या रस्त्याची रुंदी तीस मीटर दाखविली असूून, तशी नोंद ‘मेजरमेंट रजिस्टर’मध्ये केली आहे. त्यानुसार खोदाईची बिले काढण्यात आली आहेत. काही ठिकाणी तर ५४ मीटर रस्ता खोदल्याचे दाखविले आहे. त्याची चौकशी व्हावी. 
-चेतन तुपे,  विरोधी पक्षनेता, महापालिका

जेवढ्या प्रमाणात रस्ता बांधण्यात आला, तेवढीच खोदाई करण्यात आली आहे.  केलेल्‍या कामाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच खोदाईची  पाहणी करूनच बिले देण्यात आली आहेत. आजूबाजूचा राडारोडा उचलला आहे.
- अनिरुद्ध पावस्कर,  प्रमुख, पथ विभाग, महापालिका

रस्त्याची लांबी - १.७ कि.मी
प्रत्यक्ष रुंदी  - २४ मीटर
खोदाईचा खर्च - ४ कोटी  
खोदाईदरम्यान - ३० मीटर
रस्त्याचा खर्च - १६ कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com