लवासाकडे जाणारा रस्ता  टेमघर परिसरात खचला 

धोंडिबा कुंभार
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मुळशी तालुक्‍यात पावसाने थैमान घातल्याने लवासा रस्त्यावर ठिकठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. टेमघर धरणाच्या पायथ्याशी रस्ता मोठा तडा गेल्याने आज सुमारे तीन ते चार फूट खचला आहे. 

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्‍यात पावसाने थैमान घातल्याने लवासा रस्त्यावर ठिकठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. टेमघर धरणाच्या पायथ्याशी रस्ता मोठा तडा गेल्याने आज सुमारे तीन ते चार फूट खचला आहे. 

या भागात पावसाचे प्रमाण मोठे असल्याने रस्त्याला ओढ्यांचे स्वरूप आलेले होते. त्यामुळे राडारोडा भर रस्त्यात आला आहे. खड्ड्यांचेही प्रमाण वाढल्याने वाहनचालक त्रस्त झालेले आहेत. लवासा रस्त्यावर लव्हार्डे येथील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्याला मोठा तडा गेल्याने तो आज सुमारे तीन ते चार फूट खचला आहे.

या रस्त्यावरील वेडे गावाच्या फाट्यावर असलेल्या तीव्र वळणावर चारकोलचे झाड आजच उन्मळून भर रस्त्यात कोसळले आहे. दोन्ही बाजूने वळणे असल्याने भरधाव वाहनांना या ठिकाणी अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलावरून दक्षिण बाजूने लवासा रस्ता सुरू होतो. तीव्र वळणावरील या रस्त्याला मोठे तडे गेलेले होते. त्याची दखल कुणीही न घेतल्याने अखेर आज सकाळी हा रस्ता खचला. तीव्र वळण आणि उतार असल्याने या ठिकाणी वाहनांचा वेगही मोठा असतो. त्यामुळे या ठिकाणी वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वारंवार अपघात होत आहेत. 

या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि रस्त्यात पडलेले झाड तातडीने दूर करावे, अशी मागणी टेमघरचे उपसरपंच सचिन मरगळे यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The road leading to Lavasa traversed the Temghar area