Pune वाहतुक कोंडीच्या प्रश्‍नावर अखेर लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पोलिस उपायुक्तांच्या कारभारा वर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती

Pune : वाहतुक कोंडीच्या प्रश्‍नावर अखेर लक्ष्य

पुणे : शहरातील वाहतुक समस्येमुळे वाहतुक पोलिस पुणेकरांच्या टिकेचे धनी ठरले आहेत. दररोजची वाहतुक कोंडी, वाहतुक पोलिसांचा नियमनापेक्षा कारवाईवरील अधिक "रस', आणि ऐन रहदारीच्यावेळीही पोलिस रस्त्यांवरुन "गायब' होण्याच्या प्रकारामुळे नागरीकांकडून थेट पोलिस आयुक्तांना धारेवर धरले जात आहे. या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत वाहतुक पोलिस उपायुक्तांच्या कारभारावर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यावर सोपविली आहे. त्याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी काढला.

मागील काही महिन्यांपासून शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यांवरुन जाणाऱ्या नागरीकांचा दररोज एक ते दोन तास वाहतुक कोंडीमध्ये जात असल्याने नागरीक त्रस्त आहे. विशेषतः शहरात जोरदार पाऊस पडल्यानंतर तर रस्त्यांवर वाहतुक पोलिस दिसतच नसल्याने वाहतुक कोंडी उग्र रुप धारण करते.

त्याबाकाही दिवसांपुर्वीच "मर्सिडीज बेंझ' या आंतराराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला वाहतुक कोंडीच्या बसलेल्या फटक्‍यानंतर पुण्याच्या वाहतुक कोंडीचा विषय समाजामध्यमाद्वारे जगभर पोचला. त्यातच वाहतुक नियमनापेक्षा वाहने अडकवून कारवाई करण्यात अधिक रस घेणाऱ्या वाहतुक पोलिसांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास घेणाऱ्या तरुणाची दंडासाठी अडवणूक करून त्यास वेठीस धरल्याची घटना नुकतीच घडली, तर गुरुवारी खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर रस्त्यावर उतरुन वाहतुक नियमन करण्याची वेळ आली.

वाहतुक शाखेच्या सुरु असलेल्या बेजबाबदार कारभाराबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दररोज सर्वसामान्य नागरीकांपासून "व्हिआयपीं'पर्यंतच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागत होते. अखेर वाहतुक शाखेच्या या बेजबाबदार कारभाराची गांभीर्याने दखल घेत वाहतुक शाखेच्या पोलिस उपायुक्तांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे हे वेळोवेळी नवटके यांना वाहतुक शाखेसंदर्भातील कामकाज व कर्तव्याबाबत अहवाल सादर करणार आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी दिले.

आता वाहतुक शाखेतही बदलाची अपेक्षा

शहरातील संघटीत गुन्हेगारीवर पोलिस आयुक्तांनी "मोका'द्वारे वचक बसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघटीत गुन्हेगारी आटोक्‍यात आणणे शक्‍य झाले. हे यश मिळत असताना तर दुसरीकडे, वाहतुक समस्येमुळे पोलिस आयुक्तांना टिकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे वाहतुक शाखेबाबत कडक भुमिका घेण्याची अपेक्षा होती. त्यादृष्टीने हा बदल महत्वाचा मानला जात आहे.

वाहतुक शाखेसाठी आणखी 300 कर्मचारी नियुक्त

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आणखी 300 पोलिस कर्मचारी वाहतुक नियमनासाठी नियुक्त केले आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्याची शक्‍यता आहे.